पिंजर येथील शेतकऱ्याने वीज बिल भरल्यानंतरही पुरवठा केला खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:24+5:302021-06-10T04:14:24+5:30
पिंजर येथील शेतकऱ्याने कृषी पंपाच्या वीज बिलाचा भरणा केल्यानंतरही कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी शेतातील ...
पिंजर येथील शेतकऱ्याने कृषी पंपाच्या वीज बिलाचा भरणा केल्यानंतरही कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी शेतातील लिंबू पिकाला फटका बसत असून लिंबाची झाडे सुकत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने ११ जूनपासून पिंजर वीज केंद्रासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन दिले आहे.
पिंजर येथील महावितरण कंपनीचा कारभार ढेपाळला आहे. नागेश भगवानराव धाईत यांनी शेताजवळच्या रोहित्रावरून कृषी पंपासाठी कनेक्शन घेतले. ते नेहमी वीज बिलाचा भरणाही करतात. परंतु त्या रोहित्रावरील इतर शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही. त्यामुळे सर्वांचेच वीज कनेक्शन कापून टाकले. नागेश धाईत यांनी वीज बिल भरणा केल्यानंतर त्यांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे अपेक्षित होते. परंतु कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या आदेशानुसार धाईत यांचा वीजपुरवठा खंडित केला. कासट यांच्याशी शेतकऱ्याने संपर्क साधला असता, कार्यकारी अभियंत्यांनी सर्व शेतकरी बिलाचा भरणा करणार नाहीत तोपर्यंत वीजपुरवठा सुरू होणार नाही. शेतकरी नागेश भगवानराव धाईत यांची ३०० लिंबूची झाडे आहेत. झाडांना अनेक दिवसांपासून पाणी न मिळाल्यामुळे झाडे सुकत आहेत. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे धाईत ११ जूनपासून पिंजर वीज कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन पोलीस ठाण्याला दिले आहे.