विजेच्या धक्क्याने शेतकरी गंभीर जखमी, बैलाचा मृत्यू
By admin | Published: June 27, 2016 02:31 AM2016-06-27T02:31:33+5:302016-06-27T02:31:33+5:30
मेहकर तालुक्यातील घटना.
मेहकर (जि. बुलडाणा): स्वत:च्या शेतात पेरणी करीत असताना शेतातील विद्युत प्रवाहाचा संचार झालेल्या लोखंडी खांबाला अचानक स्पर्श झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २६ जून रोजी नेमतापूर शिवारात दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मेहकर येथील महादेव वेटाळ भागातील रहिवासी विजय तेजराव म्हस्के (५0) हे त्यांच्या नेमतापूर शिवारात पेरणी करीत होते. यावेळी पेरणीची तिफण घेऊन जात असतांना शेतात असलेल्या लोखंडी खांबामध्ये अचानक विद्युत प्रवाह येऊन जोरदार विजेचा धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला व दुसरा बैल जखमी झाला. शेजारीच असलेले समाधान सास्ते यांनी विजय म्हस्के यांच्या हातावर काठी मारल्याने ते बाजूला फेकले गेले. विजय म्हस्के यांना गंभीर अवस्थेत स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बैल दगावल्यामुळे शेतकर्याचे सुमारे ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.