कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:08 AM2017-11-01T01:08:01+5:302017-11-01T01:08:23+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्हय़ात पात्र ठरलेले आणि अपात्र ठरलेले शेतकरी, यासंदर्भात आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबत दखल घेण्याचे निर्देश देत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्यांना टप्प्या-टप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, थकबाकीदार शेतकर्यांचा सात-बारा कोरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने झालेला शेतकर्यांचा मृत्यू, कापूस-सोयाबीनची हमीभावाने खरेदी, शाश्वत शेती व विषमुक्त शेती अभियान आणि मुद्रा बँक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती इत्यादी विषयांचा जिल्हय़ातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची माहितीही किशोर तिवारी यांनी घेतली. यावेळी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांच्यासह कृषी व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढीसाठी जागृती करा!
फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी कृषी विभागाच्या अधिकार्यांना दिले. फवारणीसाठी कीटकनाशकाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जागृती करण्याचे सांगत, फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न केल्यास विषबाधा व त्यामुळे शेतकर्यांचा मृत्यू होणार नाही, यासंदर्भात शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्याचेही तिवारी यांनी सांगितले.