शेतकरी पुत्राला मिळाला मदतीचा हात!
By admin | Published: July 13, 2016 01:35 AM2016-07-13T01:35:15+5:302016-07-13T01:35:15+5:30
युवाराष्ट्र संघटनने पुढाकार घेतला असून शेतकरी पुत्राच्या शिक्षणाची सोय करणार आहे.
अकोला : तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी विनायक ढोले यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले, त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांच्या उपचारासाठी चार एकर शेती गहाण ठेवावी लागली होती. अशा स्थितीत त्यांचा मुलगा अभी याच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकल्याने अकोल्यातील युवाराष्ट्र संघटनेच्या संवेदनशील कार्यकर्त्यांंंनी या कामी पुढाकार घेतला आहे. अभीच्या शिक्षणाची व्यवस्था ह्ययुवाराष्ट्रह्णने केली असून, त्याचा शैक्षणिक प्रवास मार्गी लागला आहे. विनायक ढोले यांच्या निधनानंतर त्यांच्या घरच्या परिस्थितीची माहिती समोर आल्यावर युवाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांंंनी डॉ.विनीत हिंगणकर यांना वैद्यकीय बिलामध्ये सवलत देण्याची विनंती केली, ती त्यांनी मान्य केल्यामुळे ढोले परिवारावरील आर्थिक भार काहीसा कमी झाला; मात्र मोठा मुलगा अभी याच्या शिक्षणाचा प्रश्न कायमच होता. अभीला दहावीत ९४ टक्के गुण मिळाले आहेत, त्यामुळे या गुणवंत मुलाच्या शिक्षणाचा ट्युशन्ससह सर्व भार प्रा.अजरांबर गावंडे सर यांनी उचलला. शुक्रवारी प्रा.अजरांबर गावंडे यांनी १ लाख ३0 हजार एवढी पूर्ण ट्युशन फी माफ केली तर कॉलेजच्या प्रवेशाची फीदेखील स्वत:च भरली! अभी ढोले आता अकोल्यात शिकायला आला असून, ह्ययुवाराष्ट्रह्ण च्या आवाहनावर काही मान्यवर त्याच्या रुम व मेसची व्यवस्था करण्यासाठी योगदान देण्यास पुढे आले आहेत. अकोल्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ व ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्त्व आदरणीय डॉ. सीमा तायडे यांनी अभी ढोलेच्या अकोल्यात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याची ग्वाही युवाराष्ट्रला दिली आहे. संवेदनशील दातृत्वामुळे अभीच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती युवाराष्ट्रचे अविनाश नाकट, डॉ.नीलेश पाटील, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, दीपक नकासकर यांनी दिली आहे.