Maharashtra Election 2019 : शेतकरी आत्महत्या हे पवारांचेच पाप- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 03:42 PM2019-10-12T15:42:37+5:302019-10-12T16:33:34+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे.
अकोलाः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आत्महत्यांवर बोलताना त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. पवारसाहेब विदर्भामध्ये फिरतायत. शेतकरी आत्महत्या होतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या, शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचू दिलं नाही. तुमचे याठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषिमंत्री होतात.
15 वर्षं तुमचं सरकार होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते अकोलातल्या अकोटमध्ये महाजनादेश संकल्प यात्रेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, विदर्भाच्या हिश्श्याचा पैसा भ्रष्टाचारामध्ये तुम्ही पळवला. तुम्ही हा पैसा तुमच्या तिजोऱ्यांमध्ये नेला. पुढच्या दोन ते अडीच वर्षांत सिंचनाची सर्व कामे आम्ही पूर्ण करू, एकाही शेतकऱ्यांनं आत्महत्या केली, तर रात्रभर आम्ही झोपू शकत नाही. हे पाप तुमचं आहे, तुमच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रावर लादलं गेलं आहे. देशात 10 वर्ष कृषिमंत्री राहिल्यानंतर कुठल्या तोंडानं सांगता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केली आहे.
आपण कोणाशी लढायचं हे समजतच नाही, कोणी तेल लावायला तयार नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले आहेत, कारण महाराष्ट्रात कितीही सभा घेतल्या तरी आपले उमेदवार निवडून येत नाही हे त्यांना माहीत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विनंती केली, आता तोंड दाखवायला तरी या, त्यामुळे परत येऊन ते 1-2 सभा घेणार आहेत. पण त्यांना पक्क माहीत आहे इथे काही मिळणार नाही. राष्ट्रवादीची अवस्था फारच बिकट आहे. त्यांच्या पक्षात कोणी राहायला तयार नाही.
आधे उदर जाओ आणि आधे उदर जाओ, कोणी बचे तो मेरे पिछे आओ, अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांच्या पक्षाची झाली आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून एवढंच सांगायचं बाकी राहिलं आहे की, पुन्हा निवडून दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला ताजमहाल आणि चंद्रावर एक प्लॉट देऊ, कारण त्यांना माहीत आहे, की महाराष्ट्रात 15 ते 20 वर्षं सत्ता येत नाही. महाराष्ट्राच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणीही आरोप लावू शकलेलं नाही. जनतेचा पैसा जनतेच्याच मार्गी लागला पाहिजे, यासाठी गेली पाच वर्षं आपण कामं केलं. जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत कर्जमाफी सुरूच ठेवणार आहोत, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदीजींचे सरकार आणि आपले सरकार उभे राहिले आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये दुष्काळमुक्तीचा संकल्प आपण केला आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात सिंचन प्रकल्प करतोच आहोत. त्याच बरोबर गोसीखुर्दच्या खालून जे शेकडो टीएमसी पाणी वाहून जाते. ते 480 किमीचे टनेल तयार करून 100पेक्षा जास्त टीएमसी पाणी आपण बुलडाण्यापर्यंत आणतो आहोत. बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. वाहुन जाणारे पाणी आले तर विदर्भ सुजलाम सुफलाम होणार आहे.’’
‘माझ्यासारख्या विदर्भाच्या सुपुत्राला तुम्ही मुख्यमंत्री केल्यानंतर विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी गेल्या 5 वर्षांत आपल्या सरकारने एवढा पैसा दिला आहे, की त्यांची गेली 15 वर्ष सोडा, त्याच्याही आधीची 10 वर्ष सोडा त्यांच्या 25 वर्षामध्ये जेवढा पैसा मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त पैसा आमच्या सरकारने विदर्भाच्या विकासाठी दिला,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तत्पूर्वी, वाशिमच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवरही टीका केली. ते म्हणाले, ‘वरिष्ठ नेत्यांनी सांगितले निदान तोंड दाखवायला या. म्हणून तोंड दाखवायला राहुल गांधी येणार आहेत. पवार साहेबांच्या पक्षाचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे आता महायुतीच्या 220 जागा निवडून येतील की 240 जागा निवडून येतील, एवढीच उत्कंठा राहिली आहे. पाच वर्षांचा मुलगा देखील सांगेल, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.