कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:42 AM2017-07-20T00:42:40+5:302017-07-20T00:42:40+5:30

जिल्ह्यात दीड महिन्यात १८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

Farmer suicides due to debt relief! | कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना!

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना!

Next

संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने दीड महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफीचा गाजावाजा करण्यात येत असतानाच जिल्ह्यात गत दीड महिन्यांच्या कालावधीत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याची बाब समोर येत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात छेडण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची पहिली घोषणा मुख्यमंत्र्यांनी गत ३ जून रोजी केली. त्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा गत ११ जून रोजी शासनामार्फत करण्यात आली. या घोषणानंतर १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला.
त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवीत, सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ अद्यापही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
दरम्यान, गत १ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा गाजावाजा सुरू असला, तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याची बाब समोर येत आहे.

१ जून ते १९ जुलैपर्यंत शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे!
१ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये सुनील महादेव तांबडे (चांदूर), प्रल्हाद तुळशीराम बगले (तुदगाव), रफीकशा मोहंमदशा (वाडेगाव), सुरेश जगदेवराव काळे (वाडेगाव), शंकर शिवदास बुंदे (अनकवाडी), गणेश लक्ष्मण काळबोंडे (उमरा), वासुदेवराव रामकृष्ण थोटे (डोंगरगाव), संदीप विश्वंभर नानोटी (वाडेगाव), अशोक मारोती कळसकार (खंडाळा), मंगेश साहेबराव कापसे (कुटासा), जयप्रकाश उद्धवराव खारोडे (तळेगाव बु.), गजानन वामनराव जाधव (कावसा), भूषण महेंद्र खवले (उमरा), विजय महादेव काळपांडे (दहिगाव), रामदास संपत हिवराळे (तुलंगा), संतोष ओंकार मोकळकर (रौंदळा), श्रीकृष्ण काशीराम खाडे (सुकोडा), विनोद रामकृष्ण कुटे (हाता) इत्यादी १८ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे.

कर्जमाफीच्या मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार?
थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; परंतु त्यानंतर योजनेची व्याप्ती वाढविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाकडून अद्यापही संबंधित यंत्रणांना प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार, याबाबत संबंधित यंत्रणांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: Farmer suicides due to debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.