पठाणी वसुलीला कंटाळून शेतक-याने घेतला विषाचा घोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:55 AM2017-08-01T02:55:59+5:302017-08-01T02:56:59+5:30
अकोला: मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांच्या पठाणी वसुलीला कंटाळून तसेच पत्नीसोबत अधिकाºयांनी केलेल्या अश्लाघ्य वागणुकीने व्यथित झालेल्या निंभोरा येथील शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांच्या पठाणी वसुलीला कंटाळून तसेच पत्नीसोबत अधिकाºयांनी केलेल्या अश्लाघ्य वागणुकीने व्यथित झालेल्या निंभोरा येथील शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. दरम्यान, यासंबंधी मृतकाच्या पत्नीकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी व आ.रणधीर सावरकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. आ. सावरकर यांनी सदर प्रकरणाची माहिती अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना कळविल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या संचालक आणि अधिकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
निंभोरा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर ताथोड यांनी घर बांधकामासाठी तसेच किराणा दुकानासाठी विस्तार फायनान्सचे सोनटक्के व अस्पायर फायनान्सचे नागेश शिरसाट आणि अनिल गाठेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची त्यांनी नियमित परतफेडही केली; त्यांच्याकडे केवळ २० हजार रुपये थकीत होते. यासाठी तीन महिन्यांचा अवधी असल्याने ताथोड यांनी फायनान्स कं पनीच्या अधिकाºयांची भेट घेऊन ८ दिवसात उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासनही दिले; मात्र ३० जुलै रोजी सायंकाळी किशोर ताथोड घरी नसताना विस्तार फायनान्सचे सोनटक्के व अस्पायर फायनान्सचे नागेश शिरसाट आणि अनिल गाठे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सविता ताथोड यांच्यासोबत अर्वाच्य आणि अश्लील संभाषण केले. हे संभाषण त्यांचा ११ वर्षीय मुलगा शिवम ताथोडने ऐकले आणि घडलेला सर्व प्रकार वडील किशोर ताथोड यांना सांगितला. मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांनी वापरलेल्या भाषेमुळे मन खिन्न झालेल्या किशोर ताथोड यांनी किराणा माल आणण्यासाठी जात असल्याचे सांगून विषाची बाटली विकत आणली आणि पत्नी व मुलगा झोपलेले असताना विष प्राशन केले. ही बाब सोमवारी उघडकीस येताच ग्रामस्थांनी ताथोड यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात आणले; मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी ताथोड यांची पत्नी सविता ताथोड अकोट फैल पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत मायक्रो फायनान्स कंपनीची बाजू घेतली. हा प्रकार गावकºयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला; मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने आ. रणधीर सावरकर यांना माहिती देण्यात आली. आ. सावरकर यांनी ठाण्यात धाव घेतली. त्यानंतरही पोलिसांची टाळाटाळ सुरू असल्याचे त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांशी चर्चा केली. यानंतर विस्तार फायनान्सचे सोनटक्के , अस्पायर फायनान्सचे नागेश शिरसाट,अनिल गाठे यांच्याविरुद्ध कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता ताथोड रुग्णालयात दाखल
सविता ताथोड या गर्भवती असताना त्यांना पोलीस ठाण्यात साधी बसण्याचीही सुविधा देण्यात आली नाही. सकाळी ८ वाजेपासून ते १२ वाजेपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी पुढाकार घेतला; मात्र दळभद्र्री पोलीस प्रशासनाने त्यानंतरही लक्ष दिले नाही. प्रत्यक्षात आ. सावरकर यांनी धाव घेतल्यावरही पोलीस प्रशासन गप्प होते. एका गर्भवती महिलेचा पती मृत्यू पावल्यानंतर तिचा छळ करणाºया प्रशासनाने मायक्रो फायनान्स कंपनीच्या पाठीशी एवढे उभे राहण्यामागे कारण काय, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. पतीचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्यानंतर सायंकाळी सविता ताथोड यांचीही प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कार्यक्रम अर्धवट सोडून सावरकरांची धाव
निंभोरा येथील गावकºयांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या दिला व ही बाब आमदार रणधीर सावरकर यांना भ्रमणध्वनीवर देण्यात आली, आ. सावरकर यांनी चिखलगाव येथील कार्यक्रम अर्धवट सोडून त्वरित अकोट फैल पोलीस स्टेशन गाठले व ठाणेदाराला कारवाई करा, असे सांगितले. कारवाई न झाल्याने आ. सावरकर यांनी त्वरित अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची भेट भेऊन ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.
संतोष भगत नामक व्यक्ती या प्रकरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर तसेच शेतकºयाचा मृत्यू झाल्याने मर्ग दाखल करून प्रकरणाची पुढील चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार होता; मात्र तेवढ्यात ग्रामस्थ एकत्र झाले आणि आ. सावरकर यांना माहिती देण्यात आली. आ. सावरकर ठाण्यात आले. यानंतर त्यांनाही महिलेचे बयान घेतल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले; मात्र त्यांनी हा प्रकार पोलीस अधीक्षकांना सांगितला. सदर तक्रार घेण्यास कोणताही वेळ झालेला नसून, कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
- तिरुपती राणे, ठाणेदार, अकोट फैल, अकोला.