सात एकरातील तुरीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 07:04 PM2021-10-31T19:04:34+5:302021-10-31T19:04:41+5:30
Farmer News : नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर आली आहे.
मूर्तिजापूर : तालुक्यात अतिवृष्टी वर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे, या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी आली आहे.
आलुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, अतीवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, कपाशी, व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अतीवृष्टीमुळे तुर या पिकाची वाढ खुंटली तर काही ठीकाणी पिक पिवळे पडून वाळले आहे, तर हजारो हेक्टर वरील सोयाबीन पीक प्याण्याखाली आल्याने उत्पादन घटले आहे, त्याच बरोबर तुर परीस्थिती प्रचंड खालावली असल्याने लागवडीचा खर्चही निघणार नाही, हे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवून हरभरा पेरणीच्या तयारीला लागले आहे. अशातच कमळणी कमळखेड येथील सधन शेतकरी प्रशांत कांबे यांनी आपल्या सात एकरात पेरलेल्या तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात लागवडीचा खर्च निघणार नाही, हे ओळखून हरभरा पेरणीसाठी शेती तयार करीत असल्याचे प्रशांत कांबे यांचे म्हणणे आहे.