पीक विम्याच्या लाभाविना शेतकरी वा-यावर!
By admin | Published: May 3, 2016 02:17 AM2016-05-03T02:17:28+5:302016-05-03T02:17:28+5:30
खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकोला जिल्हय़ातील साडेतीन लाखावर शेतक-यांना पीक विम्याची प्रतीक्षा.
संतोष येलकर /अकोला
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्यांना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेला शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित असताना पीक विम्याच्या लाभाविनाही वार्यावर आहे. त्यामुळे पीक विम्याच्या रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्हय़ातील ३ लाख ६८ हजार ८२३ शेतकर्यांनी खरीप पिकांचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकर्यांनी १५ कोटी १५ लाख २८ हजार रुपयांची रक्कम राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडे जमा केली. ना िपकीमुळे जवळ पैसा नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला असून, येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी शासनामार्फत दुष्काळी मदत अद्याप प्राप्त झाली नाही. शासनाच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्यांकडून पीक विमा रकमेचा लाभदेखील अद्याप मिळाला नाही. यावर्षीचा पावसाळा वेळेवर सुरू होण्याचा अंदाज हवामान वेधशाळांनी वर्तविला आहे. त्यानुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे.