वन्य प्राण्यांच्या हैदोसात १२ गावांतील शेतकऱ्यांनी सोडून दिला ज्वारीचा पेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 10:51 AM2021-07-12T10:51:54+5:302021-07-12T10:52:15+5:30
Agriculture News : गेल्या ११ वर्षांपासून या पिकांची पेरणी बंद करण्यात आल्याने, संबंधित गावांमध्ये या पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे.
- संतोष येलकर
अकोला: वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्याने, अकोला तालुक्यातील १२ गावांमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी, मूग व उडिदाचा पेरा सोडून दिला आहे. गेल्या ११ वर्षांपासून या पिकांची पेरणी बंद करण्यात आल्याने, संबंधित गावांमध्ये या पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे. यासोबतच सोयाबीन, तूर आणि कपाशीचे पीक वन्य प्राण्यांच्या हैदोसातून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धाेक्यात टाकून धडपड करावी लागत आहे.
जिल्हयातील अकोला तालुक्यात म्हैसांग, रामगाव , गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, पळसो बढे, दहिगाव गावंडे, बहिरखेड, कौलखेड जहाॅगीर, मजलापूर, दापूरा, अंबिकापूर व कट्यार इत्यादी १२ गावांमध्ये ज्वारी, संकरीत ज्वारी, मूग व उडिद या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येत होते. महत्वाचे पीक म्हणून या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. परंतू २००९ ....१० पासून या गावांतील शेतांमध्ये हरिण, जंगली डुकर व रोही इत्यादी वन्य प्राण्यांचा हैदोस सुरु झाला. शेतात पेरलेले ज्वारी, मूग व उडिदाचे पीक वन्य प्राण्यांच्या हैदोसात उध्वस्त होत असल्याने गेल्या ११ वर्षांपासून १२ गावांतील शेतकऱ्यांनी या पिकांचा पेरा सोडून दिला. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळात पेरलेले पीक काहीच हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी बंद केली. त्यामुळे या गावांतील ज्वारी, मूग, उडिदाचे उत्पादन नामशेष झाले आहे. सद्यस्थितीत या गावांमध्ये सोयाबीन, तूर व कपाशी या पिकांचे उत्पादन घेण्यात येत असले तरी, वन्य प्राण्यांच्या हैदोसातून ही पिके वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून धडपड करावी लागत आहे.
पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते धडपड!
शेतात उगवलेले सोयाबीन, कपाशी व तुरीचे पीक वन्य प्राणी फस्त करतात. वन्य प्राण्याच्या हैदोसात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून रात्रीच्यावेळी शेतात जाऊन धडपड करावी लागते. वन्य प्राण्यांना पिटाळून लावण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात फटाके फोडणे, वेगवेगळे आवाज काढणे, डबे वाजविणे इत्यादी उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत.
मूग, उडिदाची डाळ विकत घेण्याची वेळ!
वन्य प्राण्यांच्या हैदोसाला कंटाळून १२ गावांमध्ये ११ वर्षांपासून ज्वारी, मूग व उडिदाचा पेरा बंद झाल्याने, या गावांतील जनावरांसाठी कडबा व कुट्टीचा चारा बंद झाला आहे. तसेच मूग व उडिदाची डाळ विकत घेण्याची वेळ या गावांतील शेतकऱ्यांवर आली आहे.
वन्य प्राण्यांच्या वाढत्या हैदोसाला कंटाळून १२ गावांत गेल्या ११ वर्षांपासून ज्वारी, मूग व उडीद या पिकांची पेरणी करणे शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. त्यामुळे या भागातील संबंधित पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे. सोयाबीन, कपाशी व तूर या पिकांची पेरणी केली जाते. मात्र, वन्य प्राण्यांच्या हैदोसातून ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून धडपड करावी लागते.
- शिवाजीराव भरणे, शेतकरी, रामगाव, ता. अकोला.