लाच घेताना कृषि अधिकारी व सहायकास पकडले
By admin | Published: April 8, 2016 02:06 AM2016-04-08T02:06:26+5:302016-04-08T02:06:26+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना; १५ हजाराची लाच स्वीकारताना अटक.
बुलडाणा : एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारताना मलकापूर तालुका कृषी अधिकारी व कृषि सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रंगेहाथ पकडले.
चिखली येथील रहिवासी नवृत्ती विठ्ठल जाधव यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय तथा वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेच्या माध्यमातून उपजिविका प्रशिक्षण कार्यक्रम मलकापूर येथे घेतला. हा प्रशिक्षण कार्यक्रम २४ मार्च रोजी पूर्ण करण्यात आला. या प्रशिक्षणाचे १ लाख ८७ हजार ५00 रूपयांचे देयक मंजुरीसासठी संबंधित विभागातर्फे पाठविण्यात आले. या देयकाच्या मंजुरीसाठी मलकापूर तालुक्याचे कृषि अधिकारी विजय खोंदील याची स्वाक्षरी आवश्यक होती; मात्र त्यांनी यासाठी २0 हजार रूपयांची मागणी केली. लाचेची रक्कम जास्त असल्यामुळे फिर्यादी नवृत्ती जाधव यांनी १५ हजार रूपये देण्याचे कबुल केले. ही रक्कम तालुका कृषि अधिकारी विजय लक्ष्मण खोंदील (वय ४५) याने त्याचा कृषि सहायक नागेश सुधाकर डुकरे (वय ४0) याच्याजवळ जमा करण्यास सूचविले. ही रक्कम गुरूवारी बैठकीनंतर देण्याचे ठरले. गुरूवारी बुलडाणा येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात अधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृषि उपविभागीय कार्यालय परिसरात सापळा रचला. बैठकीनंतर दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली. यावेळी फियादीकडून १५ हजाराची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.