कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 03:54 PM2024-05-28T15:54:10+5:302024-05-28T15:54:21+5:30

यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कापूस बियाणे पुरवठा करणारे बियाणे उत्पादक कंपनीकडून पुरवठ्याचे नियोजनसुद्धा घेण्यात आले आहे.

Farmers are aggressive as they do not get seeds of a specific variety of cotton; Line up at the agricultural service centers since morning | कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा

कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा

अकोला :  जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकरिता १ लाख ३५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी प्रस्तावित आहे. त्या क्षेत्राकरिता प्रती हेक्टर ५ बियाणे पाकिटानुसार एकूण ६ लाख ७७ हजार ५०० पाकिटांची मागणी कृषी आयुक्तालयास करण्यात आलेली होती. दरम्यान जिल्ह्यात सुरुवातीपासूनच बीटी कपाशीच्या एका वाणाची मागणी प्रचंड आहे. सध्या बियाणे मिळण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच शहरातील कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत. विशिष्ट वानाचे बियाणे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने मंग‌ळवार, दि. २८ मे रोजी शहरात शेतकऱ्यांचा आक्रोश पहावयास मिळाला. पोलीस कर्मचारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मधस्थी केल्याने वातावरण शांत झाले. 

   यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कापूस बियाणे पुरवठा करणारे बियाणे उत्पादक कंपनीकडून पुरवठ्याचे नियोजनसुद्धा घेण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये ७ लाखपेक्षा जास्त बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्याचे बियाणे कंपन्यांनी नियोजन सादर केलेले आहे. परंतू जिल्ह्यात बीटी कपाशीच्या एका वाणाची प्रचंड मागणी असून, शेतकरी बियाणे मिळविण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटनाही समोर आली आहे. मंगळवारी शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर रांग केली होती. परंतू बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. 

जिल्ह्यात मागणी असलेल्या विशिष्ट कापूस बियाण्याचा कंपनीकडून पुरवठा थांबवला!
जिल्ह्यामध्ये दि. १६ मे पासून कपाशी बियाणे वाटपाला सुरुवात झाली असून, तेव्हापासूनच जिल्ह्यात विशिष्ट एकाच वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. बियाण्यासाठी शेतकरी सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यात मागणी असलेल्या विशिष्ट वाणाचा कंपनीकडूनच पुरवठा थांबवला असून, यासंदर्भात कंपनी प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांना पत्राद्वारे कळविले आहे. आतापर्यंत कंपनीने सुधारित नियोजनानुसार १ लाख ५२ हजार पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यामध्ये केला आहे.

आतापर्यंत प्राप्त पुरवठ्याची विक्री
शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या एका वाणाचा कंपनीकडून पुरवठा करण्यात आला असून, त्या कंपनीच्या प्राप्त बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
दि. २६ व २७ मे रोजी जिल्ह्यामध्ये कृषी विभाग, महसूल विभाग व पोलिस प्रशासनाचे कर्मचाऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्यांना टोकन पद्धतीचा वापर करून बियाण्याची विक्री करण्यात आलेली आहे. एका विशिष्ट वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा पुरवठा थांबविला असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे.

आतापर्यंत कंपनीच्या प्राप्त बियाण्याची विक्री करण्यात आली आहे. इतर कंपनीचे कापूस बी.टी. बियाणे बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्या बियाण्याची शेतकऱ्यांनी खरेदी करावी. जिल्ह्यात साठेबाजी अथवा जादा दराने बियाण्याची विक्री करण्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.
 

Web Title: Farmers are aggressive as they do not get seeds of a specific variety of cotton; Line up at the agricultural service centers since morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस