पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, भरपाई म्हणून मिळाले केवळ ९० रुपये
By रवी दामोदर | Published: November 25, 2022 04:27 PM2022-11-25T16:27:02+5:302022-11-25T16:27:18+5:30
पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असून भरपाई म्हणून केवळ ९० रुपये मिळाले आहेत.
अकोला : गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी विविध संकटाचा सामना करीत असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच आता पीक विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांंच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खातात पीक विम्यापोटी भरपाई रक्कम जमा केली जात असून, जी शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यावर केवळ ९० रुपये रक्कम या कंपनीकडून जमा केली आहे. आता ही विम्याची रक्कम पीक विमा कंपनीला परत करणार असल्याची भूमिका शेतकऱ्याने घेतली आहे. अत्यंत तोकडी रक्कम जमा करण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. किमान जी रक्कम पीक विम्यासाठी भरली तेवढी तरी रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदा अतिवृष्टी व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत मिळाली. मात्र ती रक्कम अतिशय कमी असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांना त्यासाठी निवेदन देऊन, आंदोलन करून मागणी करावी लागली. त्याचा उपयोगही झाला, मात्र पीक विम्यापोटी मिळणारी भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. शुक्रवारी बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात केवळ ९० रुपये कंपनीकडून जमा करण्यात आले आहे. भरपाई अत्यंत कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
३.२० लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी भरले २४.१४ कोटी
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनीकडे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल ३ लाख २० हजार ९४१ शेतकऱ्यांनी २४ कोटी २४ लाखांचा विमा भरला होता. ज्यामाध्यमातून २ लाख ६५ हजार १२१ हेक्टर एवढे पीक क्षेत्र संरक्षित केले होते.