शेततळय़ासाठी अर्ज करताना शेतक-यांसमोर अनंत अडचणी!
By admin | Published: March 11, 2016 02:47 AM2016-03-11T02:47:50+5:302016-03-11T02:47:50+5:30
विदर्भातील शेतकरी शेततळ्यांपासून वंचित राहण्याची शक्यता.
अकोला: शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे; पण ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांना अनेक अडचणी येत असल्याने विदर्भातील शेतकरी शेततळ्य़ाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी, पाणलोट व जलसंवर्धन, माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना आणली आहे. विदर्भात अलीकडे पावसाचे सरासरी प्रमाण घसरल्याने शेतकरी शेततळ्य़ात पावसाचे पाणी साचवून संरक्षित सिंचन करतात, त्यामुळे विशेषत: खारपाणपट्टय़ात शेततळ्य़ांची गरज आहे. शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्यांच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे; पण यावेळी शेततळ्य़ांचे अर्ज ऑनलाइन भरावे लागत असल्याने ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शेतकर्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अर्ज भरावे लागत आहेत; तथापि अनेक शेतकर्यांना याबाबत माहितीच नसल्याने असे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कृषी विभागाने पुढे येऊन शेतकर्यांना याबाबतची माहिती देण्याची गरज आहे.