पावसाअभावी शेतकरी बेहाल
By admin | Published: July 4, 2014 12:19 AM2014-07-04T00:19:16+5:302014-07-04T00:44:05+5:30
जुलै महिना उजाडला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
अकोला: जुलै महिना उजाडला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीचे फेरनियोजन करण्याची पाळी आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फेरपेरणीचे आपत्कालीन नियोजन केले आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस आलाच नाही, तर मात्र कपाशी पेरणीचेदेखील फेरनियोजन करावे लागणार आहे.
खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, तूर, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; परंतु यंदा जून संपला आणि जुलै महिना लागला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने या कृषी विद्यापीठाने जुलै महिन्याचे पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक होते; तथापि पाऊस नसल्यामुळे मूग, उडीदाची सलग पेरणी आता शक्य नाही. एवढय़ात पाऊस आला तरच आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल; मात्र त्यासाठी २0 टक्के बियाणे जास्त वापरावे लागणार आहे. कापूस पेरणी करण्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीन उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी लवकर परिपक्व होणारा अमेरिकन अथवा देशी कापूस उपयुक्त ठरणार आहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा, तसेच संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रावर कापूस: ज्वारी: तूर: ज्वारी (६:१:१:१) किंवा (३:१:१) त्रिस्तरीय कापूस अधिक तूर अशा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.
सलग सोयाबीन पिकासाठी शिफारशीप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन आणि तूर आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकर्यांना फायदा होतो. सलग ज्वारी पिकासाठी शिफारशीसह ज्वारी अधिक तूर (३:३) आंतरपीक पद्धतीमुळे फायदा होतो. २0 ते २५ टक्के बियाणे जास्त वापरावे, तूर शिफारशीप्रमाणे लागवड करावी, कापूस अधिक तूर (६:२) किंवा सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक घ्यावे. मूग, उडीद पिके ही उथळ काळ्य़ा जमिनीत लावावी, मका शिफारशीप्रमाणे लागवड करावा, तर धानाची शिफारशीप्रमाणे रोवणी करावी, असा सल्ला विद्यापिठाने दिला आहे.