शेतकरी संघटनेची सेंट्रल बँकेत धडक
By Admin | Published: July 3, 2017 01:52 AM2017-07-03T01:52:00+5:302017-07-03T01:52:00+5:30
कर्ज पुरवठ्यास दिरंगाईचा विचारला जाब
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या अकोट तालुक्यातील अडगाव येथील शाखेत शेतकऱ्यांना सिंचनाकरिता कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याच्या व शेतकऱ्यांना योग्य वागणूक दिल्या जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बँकेचे प्रादेशिक कार्यालय गाठले. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येऊन शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले. अडगाव बु. येथील काही शेतकऱ्यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा अडगाव बु.ला ठिबक सिंचनाकरिता कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी ९ डिसेंबर २०१६ ला आवश्यक कागदपत्रांचा पुरवठा केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषी अधिकारी रूपाली खारोडे आणि बँकेचे मुख्य अधिकारी नवनीत कुमार यांनी पत्र दिले. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी २२ मार्च २०१७ ला आपली जमीन बँककडे गहाण दिली. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना रोज नवीन कारणे देऊन उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. चार महिने बँकेचे उंबरठे झिजवावे लागल्यानंतरही कर्ज मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे तक्रार दाखल केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत या शेतकऱ्यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे प्रादेशिक कार्यालय गाठले व झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर प्रादेशिक अधिकारी सिन्हा यांनी झालेला प्रकार चुकीचा असल्याचे कबूल करीत सदर शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सतीश देशमुख, प्रशांत गावंडे, जिल्हा युवा आघाडी प्रमुख अविनाश नाकट, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, अकोट युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्र्रे, गोपाल निमकर्डे, अमोल मसुरकार, गणेश बहाकर, प्रशांत बहाकर, जाफरखा, आमदखा, साजिदखा वलायत खा, मुजाईद हुसेन, जफर हुसेन, प्रशांत देशमुख व सुरेश सोनोने आदी उपस्थित होते.