तूर खरेदीसाठी शेतक-याचा आत्मदहनाचा इशारा!
By admin | Published: March 12, 2017 02:26 AM2017-03-12T02:26:20+5:302017-03-12T02:26:20+5:30
शेतक-याने कौलखेड फाटा येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
अकोला, दि. ११- पळसो बढे येथील शेतकर्याने कौलखेड जहा येथे नाफेडच्या केंद्रावर नेलेली तूर १७ दिवसानंतरही मोजल्या गेली नाही. त्यामुळे, तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकर्याने १६ मार्च रोजी कौलखेड फाटा येथे आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
शासकीय हमी भावाने तूर विकण्यासाठी पळसो बढे येथील अनिल केशवराव बोर्डे यांनी एका वाहनात तूर भरून नाफेडच्या कौलखेड जहा येथील केंद्रावर २१ फेब्रुवारी रोजी नेली होती. नाफेडच्या वतीने सात दिवसानंतर २८ फेब्रुवारी रोजी तुरीची मोजणी सुरू केली. ७८ कट्टे मोजल्यानंतर बारदाना नसल्याचे कारण समोर करून नाफेडने खरेदी बंद केली. बोर्डे यांचा अध्र्या तुरीची मोजणी करण्यात आली तर उरलेला माल तसाच केंद्रावर पडून आहे. आतापर्यंत या केंद्रावर तुरीची खरेदीच सुरू झालेली नाही. केव्हा होणार याविषयी कुणीही माहिती देत नाही. त्यामुळे, सदर शेतकर्याला वाहन भाड्याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच बँकवाले कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. हे कर्ज फेडण्यासाठीच बोर्डे यांनी तूर विक्रीसाठी आणली होती; मात्र अध्र्या तुरीचे मोजमाप राहिल्याने पैसेही मिळालेले नाहीत. १७ दिवसांपासून मोजणीच झाली नसल्याने व्यवहार ठप्प झाला आहे. नाफेडला मोफत बारदाना देण्याचा प्रस्ताव ठेवूनही खरेदी सुरू होत नसल्याचा आरोप बोर्डे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. येत्या सात दिवसात उर्वरित तुरीचे मोजमाप केले नाही तर १६ मार्च रोजी कौलखेड फाटा येथे आत्मदहन करण्याचा इशारा बोर्डे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रति पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहे.