शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ; मुगाची बाजारातच विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:22 PM2019-10-14T13:22:55+5:302019-10-14T13:24:21+5:30
सणासुदीच्या दिवसांत विकलेल्या मुगाचे चुकारेही वेळेवर मिळत नसल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय मूग खरेदीला उशीर झाला. खरेदी सुरू झाली तर प्रतवारीचे निकष लावण्यात आले. एवढेच नाही, तर सणासुदीच्या दिवसांत विकलेल्या मुगाचे चुकारेही वेळेवर मिळत नसल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, हमीपेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी दराने त्यांच्याकडे शिल्लक असलेला मूग बाजारात विकणे सुरू केले आहे.
मूग पीक परिपक्वतेचा कालावधी ६० ते ६५ दिवसांचा असतो. यावर्षी आॅगस्ट महिन्यात म्हणजे आठ ते दहा दिवस उशिराने मूग काढणीला सुरुवात करण्यात आली; परंतु शासकीय खरेदी केंद्र दीड ते दोन महिने उशिरा सुरू करण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांनी काढणी हंगामाच्या सुरुवातीला अत्यंत अल्प दरात मूग विकला. ज्या शेतकºयांकडे साठवणुकीची व्यवस्था होती, त्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर मूग विक्रीसाठीची आॅनलाइन नोंदणी केली.
तथापि, जे काही अल्प शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली, तिथे प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असून, सणासुदीच्या काळात वेळेवर चुकारेही मिळत नसल्याने शेतकºयांनी बाजारात मूग विक्रीला काढला आहे. शनिवार बाजार बंद होण्याच्या दिवशी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत ४०० क्ंिवटल मूग विक्रीसाठी आला होता. हा एका तालुक्याचा मूग आहे. शेतकºयांना त्यांच्याकडील मुगाला कमीत कमी ४,५००, ते सरासरी सहा हजार रुपये क्ंिवटलप्रमाणे दर मिळाले. यावर्षी शासनाने मुगाला प्रतिक्ंिवटल सात हजार पन्नास रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु या हमीदराचा फायदा झाला नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात मूग खरेदीला अल्प प्रतिसाद
जिल्ह्यात तीन लाख शेतकरी आहेत. मूग उत्पादक शेतकरी ३० ते ४० हजार आहेत. त्यापैकी आतापर्यंत १,६८८ शेतकºयांनीच आॅनलाइन नोंदणी केली असून, २३७ उडीद उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीची अंतिम मुदत १५ आॅक्टोबरपर्यंत आहे; परंतु शेतकºयांचा प्रतिसाद नाही.
शासकीय मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, १५ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. शेतकºयांनी नोंदणी करावी तद्वतच काही अडचणी आल्यास तालुका, जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा सहकारी उपनिबंधक,अकोला.