अतिदुर्गम भागातील शेतक-यांना शेतावर धडे!
By admin | Published: March 4, 2016 02:04 AM2016-03-04T02:04:50+5:302016-03-04T02:04:50+5:30
पीकवाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.
अकोला: अखिल भारतीय समन्वयीत दीर्घ मुदतीय खंत संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने विदर्भात एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणार्या या प्रकल्पांतर्गत दुर्गम भागातील शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी अतिदुर्गम भागात शेती शाळाही भरवण्यात येत आहेत.
आदिवासी उपयाजनेंतर्गत अतिदुर्गम भागातील शेतकरी उत्पादन वाढीसाठी सक्षम व्हावा,या उद्देशाने विदर्भात शेतकर्यांच्या शेतावर शेती दिन व इतर कार्यक्रम घेऊन शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. अलिकडची शेतीपुढील आव्हाने बघता, शेतकर्यांसाठीच्या योजनांवर अधिक भर देण्यात आला असून, कृषी विद्यापीठामार्फत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. अखिल भारतीय समन्वयीत दीर्घ मुदतीय खत संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने प्रत्यक्ष शेतावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करू न पीक उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी मंगळवारी विदर्भातील इतर भागासह अमरावती जिल्हय़ातील धारणी तालुक्यातील नांदुरी येथे आदिवासी शेतकरी बांधवांना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनासंदर्भात मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डी.बी. तामगाडगे यांनी शेतकर्यांना शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. दीर्घ मुदतीय खत संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. डी.व्ही. माळी यांनी दीर्घ मुदतीय खत प्रयोगातील ठळक निष्कर्ष आणि गहू,हरभरा पिकाकरिता खत व्यवस्थापन या विषयावर शेतकर्यांना इत्यंभूत माहिती दिली. माती परिक्षण महत्त्वाचे असल्याने डॉ. सचिन नंदापुरे यांनी माती परिक्षणाचे महत्त्व व मातीचा नमुना घेण्याची पद्धत याविषयी शेतकर्यांना माहिती दिली. ए.बी. आगे यांनी पीक एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. शेतावरील शेती दिन कार्यक्रमाला गावकरी लालजी तांडीलकर, छगन खडके, मंगल तांडलीकर आदींसह आदिवासी शेतकर्यांची उपस्थिती लक्षणिय होती.