ई-पीक पाहणीवर शेतकऱ्यांचा बहिष्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:21 AM2021-09-18T04:21:01+5:302021-09-18T04:21:01+5:30
अकोट : शासनाने ई पीक पाहणीची नोंद करून शासनाकडे नोंद करण्याची जबाबदारी टाकली. परंतु अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ...
अकोट : शासनाने ई पीक पाहणीची नोंद करून शासनाकडे नोंद करण्याची जबाबदारी टाकली. परंतु अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील शेतकऱ्यांनी सबळ कारणे देत ई-पीक पाहणीवर ॲपवर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कारासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
अतिवृष्टी, संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शासन ई-पीक ॲप निर्मिती करून पीकपाहणी व नोंदी करण्याची जबाबदार शेतकऱ्यांना देऊन मोकळे झाले. दरम्यान पिंप्री खुर्द, पिंप्री जैनपूर येथील शेतकरी तथा गावकऱ्यांनी ई-पीक पाहणीसंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी दिल्या. त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाहीत, काहींना त्यामधील ज्ञान नाही. ज्ञान असेल तर ई-पीक पाहणी ॲपवर लोड होत नाही. आदी सर्व बाबींचा विचार करून ई-पीक पाहणी ॲपवर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. या संदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला. ठरावाची प्रत निवेदन तहसीलदार यांना देऊन पीक पाहणीचे काम पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडे सोपविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.