जिल्ह्यात १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार शेततळे !
By admin | Published: May 1, 2017 03:07 AM2017-05-01T03:07:41+5:302017-05-01T03:07:41+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : ‘मागेल त्याला शेततळे’ उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश
अकोला : जिल्ह्यात १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे आहेत, असा संकल्प करीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.
अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय बोलत होते. जिल्ह्यात यावर्षी १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ‘मागेल त्याला शेततळे ’ योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी पांडेय यांनी कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील विविध योजना आणि विकास कामांचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
‘जलयुक्त शिवार’ची अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण करा!
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, अपूर्ण कामे महिनाभराच्या कालावधीत (जून अखेरपर्यंत) पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.
तीन लाख शेतकऱ्यांना ‘पीक विम्या’चे कवच देणार!
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत येत्या दोन -तीन महिन्यात जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत समाविष्ट करून, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे कवच देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.