धानोरा येथील शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:33+5:302020-12-14T04:32:33+5:30
पारस : येथून जवळच असलेल्या धानोरा शेतशिवारात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत ...
पारस : येथून जवळच असलेल्या धानोरा शेतशिवारात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत होती. या आनुषंगाने नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठ्यांना दिला होता; मात्र धानोरा शेतशिवारात तलाठ्याने सर्व्हे न केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदाराना निवेदन देऊन तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, धानोरा शेतशिवारात नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे न झाल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. याबाबत कृषी सहायकाशी संपर्क केला असता तलाठी माझ्यासोबत पीक नुकसानाच्या सर्व्हेसाठी आलेच नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तलाठ्याच्या हलगर्जीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. वरिष्ठांनी चौकशी करून तलाठ्यावर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना धानोरा शेतशिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)