सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:45 PM2020-02-22T12:45:51+5:302020-02-22T12:46:18+5:30
दोन दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले.
अकोला: परवानाधारक सावकारांनी कर्ज देताना सोने तारण ठेवून शेतकऱ्यांना पासबुक न देता कच्च्या पावत्या देऊन त्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. यासंदर्भात ‘सीआयडी’मार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने दोन दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले.
परवानाधारक सावकारांकडून सावकारी अधिनियमानुसार कर्ज वाटप किती करण्यात आले, यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, सावकारी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यापासून आजपर्यंत गहाण वस्तू सोडवून घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत वगळण्यात आलेल्या पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, परवानाधारक सावकाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात शासकीय व्याजदराचे फलक लावण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय धरणे आंदोलन २१ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आले आहे.
या धरणे आंदोलनात सावकारग्रस्त शेतकरी समितीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शर्मा, नाना वाघमारे, सुधाकर खंडारे, अनिल घावट, बाळू गव्हाळे, भारत शर्मा, सचिन पाटील, सुरेश अंधारे, भारत खंडारे व रूपराव रामटेके यांनी सहभाग घेतला आहे.