शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:50 PM2019-11-01T12:50:28+5:302019-11-01T12:50:36+5:30
शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.
- संतोष येलकर
अकोला: सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात २० लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी व भात पिकाचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.
पावसाळा संपल्यानंतर गत २० आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस सतत बरसत आहे. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने, कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांसह कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भिजलेले सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत अशा एकूण २५ जिल्ह्यांत २० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
पीक नुकसानाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ!
पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी पीक नुकसानाची माहिती संबंधित पीक विमा कंपनीकडे देणे आवश्यक आहे; मात्र तालुकास्तरावर विमा कंपनीचे अधिकारीच उपलब्ध नाहीत, त्यामुळे पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये सादर करण्यासाठी शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे. पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.