शेतकऱ्यांना कृषी विमा, पीक कर्ज, प्रोत्साहन अनुदान नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:42+5:302021-05-18T04:19:42+5:30
बाळापूर : कोरोनामुळे शेतकऱ्यांसोबत अनेक व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक कर्ज, पीक ...
बाळापूर : कोरोनामुळे शेतकऱ्यांसोबत अनेक व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक कर्ज, पीक विमा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान शासनाकडून देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत आपल्या शेती पेरणीला लागणारे साहित्य खरेदी कसे करावे, पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
शेतकऱ्यांनी २०२०मध्ये खरीप पिकाच्या काढलेल्या कृषी विम्याची नुकसानभरपाई दुसरा खरीप हंगाम सुरु होण्याची वेळ होत आली तरी देण्यास कृषी विमा कंपनी टाळाटाळ करत आहे. तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने पिकांसहित सुपीक शेती वाहून गेली होती. महसूल व कृषी प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करुन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला पाठवला. परंतु, नुकसानभरपाई मिळाली नाही. राज्य शासनाने २०१९-२०मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी केली. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमाच झाली नाही. लॉकडाऊनच्या नावाखाली राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटप करण्यासाठी तातडीने पावले उचलावी. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक कर्ज, प्रोत्साहन अनुदान, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विमा काढला होता. परंतु, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. पेरणीपूर्वी पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करावी.
- महेश चव्हाण, शेतकरी, कवठा (बहादुरा)
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मोधापूर शेतशिवारात ढगफुटीने तोंडाशी आलेले पीक सुपीक जमिनीसह माती वाहून गेली. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण केले. परंतु, नुकसानभरपाई अद्यापही मिळालेली नाही.
- संतोष भिसे, शेतकरी, मोधापूर
शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यासाठी मार्च महिन्यात कर्जाचा भरणा केला. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. कोरोनाची भीती दाखवून पीक कर्ज देण्यासाठी तारीखवर तारीख देत आहेत.
- गुलाब बाखडे, शेतकरी, बाळापूर
राज्य शासनाने मागील वर्षी थकीत शेतकऱ्यांना पीककर्ज माफी दिली व नियमित कर्जभरणा करणाऱ्यांवर एकप्रकारे अन्याय केला. त्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु, शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
- अजय वानखडे, शेतकरी, बाळापूर