शेतकऱ्यांनो; पेरणीची घाई नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:42+5:302021-06-11T04:13:42+5:30
अकोला : विदर्भात १० ते १३ जूनदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर बियाणे न उगवण्याचा ...
अकोला : विदर्भात १० ते १३ जूनदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर बियाणे न उगवण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागामार्फत गुरुवारी देण्यात आला.
पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु १० ते १३ जूनदरम्यान विदर्भात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर पेरलेले बियाणे जमिनीत दबण्याची किंवा वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे न उगवण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे न उगवण्याचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची घाई करू नये, १७ जूननंतर पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे.
...तर दुबार पेरणीचे संकट!
१० ते १३ जूनदरम्यान विदर्भात वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूर येथील हवामान विभागाने वर्तविली आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर पेरणी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
--------------------------
१० ते १३ जूनदरम्यान, विदर्भात वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर पेरणी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीची घाई न करता १७ जूनपर्यंत पेरणी करण्याचे टाळावे.
-शंकर तोटावार,
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.