दीड लाखांवर शेतकर्यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:46 AM2017-09-12T00:46:27+5:302017-09-12T00:46:35+5:30
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार, ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार, ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी ) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांचे सेतू केंद्रांवर गर्दी होत आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८३ हजार ३0९ शेतकर्यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक नसलेल्या आणि बायोमेट्रिक मशीनवर अंगठा (थम) जुळत नसलेल्या शेतकर्यांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी जिल्ह्यात २२ केंद्रांवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघात
कर्जमाफी अर्जासोबत आधारचे विवरण जुळत नसल्याने देगाव मानकी येथील शेतकरी महिला वाडेगाव येथे जाताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचारासाठी आता पैशाचीही अडचण निर्माण झाली. त्यामुळे शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने सुरू केलेली कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकर्यांचा अवमान करणारी ठरत असून, त्यासाठी शेतकर्यांना वेठीस धरण्याचे प्रकार बंद करा, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष गौ तम सिरसाट, ज्ञानेश्वर सुलताने यांनी निवेदनात केली आहे.
मानकी येथील महिला सुधाबाई कैलास सिरसाट ही महिला कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी बाळापूर येथे गेली. तेथे आधार कार्डातील माहितीचे विवरण जुळत नव्हते. त्यामुळे महिलेला वाडेगाव येथील आधार अद्ययावतीकरण केंद्रात जाण्याचा सल्ला केंद्र संचालकाने दिला.
त्यानुसार वाडेगावकडे जाताना खड्डय़ात वाहन उसळल्याने अपघात झाला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. उ पचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. आता उपचारासाठी प्रचंड खर्च होत आहे. या प्रकारातून शेतकर्यांना वेठीस धरले जात आहे. ते त्वरित बंद करावे, अशी मागणीही सिरसाट, सुलताने यांनी केली आहे.