भाजीपाला थेट विक्रीतून शेतक-यांना मिळाला दुप्पट भाव!

By Admin | Published: January 20, 2017 02:44 AM2017-01-20T02:44:24+5:302017-01-20T02:44:24+5:30

रणधीर सावरकर यांचा पुढाकार; ताजा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Farmers get duplicate from direct sale of vegetable! | भाजीपाला थेट विक्रीतून शेतक-यांना मिळाला दुप्पट भाव!

भाजीपाला थेट विक्रीतून शेतक-यांना मिळाला दुप्पट भाव!

googlenewsNext

अकोला, दि. १९- शहरातील जठारपेठमधील किरकोळ भाजीपाला विक्रेते आणि शेतकर्‍यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी झाला. त्यामुळे गुरुवारी भाजीपाला थेट विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना बाजार भावापेक्षा दुप्पट भाव मिळाला असून, ताजा आणि स्वस्त दरात मिळणारा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनीही गर्दी केली.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत महानगरपालिकेमार्फत शहरातील जनता भाजी बाजारमधील अतिक्रमित दुकाने पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ जनता भाजी बाजारातील व्यापारी आणि दलालांनी तीन दिवसांपूर्वी भाजी बाजार बंद ठेवला. या बंदमध्ये किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी सहभाग घेतला नाही म्हणून त्यांना भाजीपाला देणे बंद करण्यात आले. किरकोळ विक्रेत्यांनी दलालांच्या या निर्णयाविरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दलालांच्या या निर्णयामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जठारपेठ भाजी विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली. किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या अडचणी आ. सावरकर यांनी समजून घेतल्या आणि शेतकर्‍यांचा शेतमाल थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार गुरुवारी पुनोती येथील मनोहर मानकर आणि शंकर सराळे या दोन शेतकर्‍यांनी आणलेली भाजीपाल्याची गाडी थेट जठारपेठमधील भाजी बाजारात पोहोचविण्यात आली. तेथील भाजी विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांनी आणलेला भाजीपाला दलाल आणि व्यापार्‍यांपेक्षा दुप्पट दराने विकत घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचविला.
थेट भाजीपाला विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना दुप्पट भाव मिळाला. ग्राहकांनाही नेहमीपेक्षा माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध झाला. त्यामुळे थेट आणि ताजा मिळणारा भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र होते.

Web Title: Farmers get duplicate from direct sale of vegetable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.