शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:35 PM2021-09-21T12:35:08+5:302021-09-21T12:35:21+5:30
Washim News : किनखेडा येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्यापही कृषिपंप जोडणी मिळाली नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सिंचन करून आपली आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने गतवर्षाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेंतर्गत रीतसर अर्ज करून आणि कोटेशनचे पैसे भरूनही वाशिम तालुक्यातील किनखेडा येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्यापही कृषिपंप जोडणी मिळाली नाही. हे शेतकरी महावितरण वाशिम कार्यालयाच्या येरझाऱ्या घालून थकले असून, याची दखल वरिष्ठांनी घेण्याची मागणी त्यांनी १७ सप्टेंबर रोजी अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा येथील शेतकरी शरद राजाराम भगत या शेतकऱ्यासह इंदू महादेव डाखोरे या महिला शेतकऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याेजनेंतर्गत कृषिपंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत. त्यात इंदू महादेव डाखोरे या आदिवासी महिला शेतकऱ्याने १८ जानेवारी २०२० रोजी महावितरण वाशिमकडे अर्ज करून कोटेशनसाठी ६९७५ रुपये रक्कम भरली, तर शरह राजाराम भगत या शेतकऱ्याने २१ फेब्रुवारी रोजी अर्ज करून कोटेशनचे ८४२५ रुपये भरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान तीन, चार महिन्यांत कृषिपंप जोडणी मिळणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षे उलटत आली तरी या शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी देण्याची तसदी वाशिम तालुका महावितरणकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे हे दोन्ही शेतकरी सतत महावितरण कार्यालयाच्या येरझाऱ्या घालत आहेत.
वाशिम उपविभागांतर्गत प्रलंबित कृषिपंप जोडणीची माहिती संबंधितांकडून घेऊ व त्याची कारणेही विचारून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कृषिपंप जोडणी देण्याच्या सूचना करू.
-रत्नदीप तायडे,
कार्यकारी अभियंता महावितरण वाशिम,