कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात १८० रुपये!

By admin | Published: May 18, 2017 01:49 AM2017-05-18T01:49:23+5:302017-05-18T01:49:23+5:30

शेतकरी त्रस्त : विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेतील प्रकार

Farmers have to pay Rs 180 for a non-loan certificate! | कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात १८० रुपये!

कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात १८० रुपये!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव वैराळे : बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, शिंगोली परिसरातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक कर्ज घेण्यासाठी बाळापूर तालुक्यातील सेंट्रल बँक लोहारा, युको बँक निंबा, सेंट्रल बँक बाळापूर, भारतीय स्टेट बँक शाखा बाळापूर, भूविकास बँक अकोला, सेंट्रल बँक गांधीग्राम व विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक अंदुरा या सर्वच बँकेचे कर्ज नसल्याचे दाखले शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी गोळा करावे लागतात. यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक बँक शाखा वेगवेगळे दर आकारत असते. पैसे घेतल्यानंतरदेखील शेतकऱ्यांना दाखल्यासाठी दिवसभर ताटकळत बसवून ठेवले जात असल्याने शेतकरी वैतागले. विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा अंदुरा गतवर्षीपर्यंत २५ रुपयांत दाखला देत होती. या बँकेने कर्ज नसल्याचा दाखला देण्याचा दर १८० रुपयांवर नेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, शिंगोली परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्येक गावातील सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी सभासद हे नव्याने पीक कर्ज घेत असतात. नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाळापूर तालुक्यातील पाच आणि अकोला शहरातील एक, अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील एक अशा सात बँकांच्या कर्ज नसल्याच्या दाखल्याची जुळवाजुळव करावी लागते. या दाखल्यांसाठी वेगवेगळ्या बँका शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दर आकारतात. यापैकी सेंट्रल बँक लोहारा ५० रुपये, युको बँक निंबा ५० रुपये, सेंट्रल बँक बाळापूर ५० रुपये, भारतीय स्टेट बँक बाळापूर ३० रुपये, भूविकास बँक अकोला २० रुपये, सेंट्रल बॅक गांधीग्राम ५० रुपये, विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बँकेने गतवर्षीच्या २५ रुपयांच्या दरात वाढ करून एकदम १८० रुपये दर आकारणे सुरू केले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासनाने शेतकऱ्यांना कर्ज नसल्याचे दाखले देण्यासाठी प्रत्येक बँकेला कमीतकमी दर आकारण्याची सूचना केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल.

बोरगाव वैराळे , हातरुण परिसरातील जे शेतकरी विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत नाहीत. त्यांना कर्ज नसल्याचा दाखला देण्यासाठी नाममात्र २५ रुपये दर आकारून कमीतकमी वेळात दाखला दिला पाहिजे. अवास्तव दर आकारूनदेखील बँकेकडून दुपारी ३ वाजताच्या नंतर दाखले दिले जात असल्याने सात बँकांचे दाखले मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आठवडाभर बँकेचे उबरंठे झिजवावे लागत आहेत. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे
- मुरलीधर पाटील, शेतकरी, हातरुण.

शेतकरी ज्या बँकेकडून कृषी कर्ज घेत असतील, त्या बँकेने कर्ज वाटपाबाबतीत जर अर्ज शेतकऱ्यांच्या सोबत दिला असेल, तर त्याला कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शून्य पैसे आकारण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. मात्र शेतकरी कृषी कर्ज मागणीचा बँकेने दिलेला अर्ज सोबत आणत नाहीत. त्यामुळे बिगर शेती कर्ज घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी १८० रुपयांचे दर आकारण्याच्या नियमानुसार त्यांना १८० रुपयेप्रमाणे दर आकारण्यात आले.
- आर.आर. मोहरीर, शाखा व्यवस्थापक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक,अंदुरा.

शेतकऱ्यांना बँकेकडून कृषी कर्ज मागणीचा अर्ज देण्यात येत नाही आणि तो अर्ज सोबत नेल्यानंतर कर्ज नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी पैसे लागत नाहीत, याबद्दल बँका शेतकऱ्यांना माहिती देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बाबीला केवळ बँकेतील अधिकारीच जबाबदार आहेत.
- विजय पाटील, संचालक, सेवा सहकारी संस्था, हातरुण.

Web Title: Farmers have to pay Rs 180 for a non-loan certificate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.