नदी-नाले कोरडे: फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच न्यावे लागतेय पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 14:03 IST2019-08-24T14:03:19+5:302019-08-24T14:03:25+5:30
जिल्ह्यातील बहुतांश गावांत पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे.

नदी-नाले कोरडे: फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच न्यावे लागतेय पाणी!
- संतोष येलकर
अकोला : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाअभावी नदी-नाले कोरडे असून, शेततळ्यांमध्येही पाणी साचले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांत पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक जोरदार पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागात नदी-नाले कोरडे असून, विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला असून, शेतातील पाटांमध्ये आणि शेततळ्यांमध्ये पाणी साचले नाही. शेतात पाणी उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर या पाच तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये शेती पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकºयांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे. बोअर, हातपंप व विहिरींचे पाणी ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकीद्वारे शेतकºयांना फवारणीसाठी शेतात न्यावे लागत आहे. त्यानुषंगाने पावसाळ्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पिकांच्या फवारणीसाठी शेतकºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणी विकत घेऊन करावी लागते फवारणी!
फवारणीसाठी शेतात पाणी उपलब्ध नसल्याने बाळापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकºयांना पिकांच्या फवारणीसाठी खासगी बोअरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. १५० रुपये प्रतिट्रॉलीप्रमाणे पाणी विकत घेऊन शेतकºयांना फवारणी करावी लागत आहे.
सरासरी ५१२.४ मिमी पाऊस; पण शेतात नाही पाणी!
जिल्ह्यात १ जून ते २३ आॅगस्टपर्यंत सरासरी ५१२.४ मिमी पाऊस पडला आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ४६६.६ मिमी, बार्शीटाकळी-५६५ मिमी, अकोट- ५९५.६ मिमी, तेल्हारा- ५३८.५ मिमी, बाळापूर- ४९७.५ मिमी, पातूर- ५०३.४ मिमी व मूर्तिजापूर तालुक्यात ४२०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी ५१२.४ मिमी पाऊस पडला असला तरी, बहुतांश गावांमध्ये शेततळे, नाले आणि पाटात पाणी उपलब्ध नसल्याने, फवारणीसाठी शेतकºयांना घरून पाणी न्यावे लागत आहे.
दमदार पाऊस पडला नसल्याने, शेतातील पाटात आणि शेततळ्यांमध्ये पाणी साचले नाही. त्यामुळे पिकांच्या फवारणीसाठी शेतकºयांना गावातील बोअरचे पाणी ट्रॅक्टर, बैलगाडीद्वारे शेतात न्यावे लागत आहे.
-शिवाजीराव भरणे,
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.