टॅ्रक्टर भाडेखर्चाचा भुर्दंड तूर उत्पादकांच्या माथी!
By Admin | Published: April 15, 2017 01:26 AM2017-04-15T01:26:08+5:302017-04-15T01:26:08+5:30
अकोला- नाफेड’द्वारे तूर खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे तुरीच्या विक्रीऐवजी ट्रॅक्टर भाडे खर्चाचा नाहक भुर्दंड तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी बसणार आहे.
दीड महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टर उभेच!
अकोला : हमी दराने ‘नाफेड’च्या तूर खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे ट्रॅक्टर उभे असताना,‘नाफेड’द्वारे तूर खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे तुरीच्या विक्रीऐवजी ट्रॅक्टर भाडे खर्चाचा नाहक भुर्दंड तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी बसणार आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत असून, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, त्या तुलनेत तूर खरेदीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने, तूर खरेदीत वारंवार अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दीड महिना उलटून जात असला, तरी शेतकऱ्यांना तुरीच्या मोजमापासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत २६ फेबु्रवारीपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या ४०० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप १४ एप्रिलपर्यंत रोजी होऊ शकले नाही. तुरीच्या मोजमापासाठी गत दीड महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत असतानाच, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुरीची खरेदी न होता, प्रतिदिवस ५०० रुपये दराने गत ५० दिवसांच्या ट्रॅक्टर भाडे खर्चाचा नाहक भुर्दंड सहन करण्याची वेळ जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
‘नाफेड’द्वारे तूर खरेदीस मुदतवाढ द्या!
खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून मोजमाच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या टॅक्टरमधील तूर खरेदी करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांची पूर्ण तूर खरेदी करण्यासाठी सरकारने नाफेडद्वारे तूर खरेदी बंद न करता, तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भंडारज खुर्द येथील तूर उत्पादक शेतकरी पांडुरंग डिगांबर भगत तसेच हातरुण येथील मोहम्मद जुबेर यांच्यासह अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दीड महिन्यांपासून तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली.
कमी दराने तूर विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ!
गत दीड महिन्यांपासून बाजार समिती परिसरात तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असतानाच १५ एप्रिलपासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांवर बाजारात व्यापाऱ्यांना कमी दराने तूर विकण्याची वेळ आली आहे. हमी दराने ‘नाफेड’च्या खरेदीत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये दराने तूर खरेदी करण्यात येत असून, बाजारात व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये दराने तूर खरेदी केली जात आहे.
५० दिवसांपूर्वी १० क्विंटल तूर विकण्यासाठी आणली; अद्याप मोजमाप झाले नाही. प्रतिदिवस ५०० रुपयांप्रमाणे ट्रॅक्टरचे भाडे द्यावे लागणार आहे; परंतु नाफेडद्वारे तूर खरेदी बंद केली तर, टॅ्रक्टर भाडे कसे देणार.
- नागोराव वाघमारे, पाळोदी
तुरीचे मोजमाप अद्याप झाले नाही. तूर खरेदी करण्यात आली नसल्याने प्रतिदिवस ५०० रुपये ट्रॅक्टरचे भाडे देणे बाकी आहे. नाफेडद्वारे खरेदी बंद झाल्यानंतर बाजारात कमी दराने तूर विकल्यावर भाडे द्यावे लागेल
-माधव भगत, भंडारज खुर्द