शेतक-यांनो, रास्त भावासाठी रस्त्यावर उतरा!
By admin | Published: October 25, 2016 02:06 AM2016-10-25T02:06:21+5:302016-10-25T02:06:21+5:30
भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांचे प्रतिपादन
वाशिम, दि. २४- शेतात राबराब राबूनही शेतमालाला अपेक्षित भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शासनावर विसंबून न राहता शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शेतकर्यांनीच आता रस्त्यावर उतरावे, असे प्रतिपादन भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
स्थानिक चिखली रोडस्थित स्त्री रुग्णालयानजिकच्या प्रांगणात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसंच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज राठोड, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.दा. भगत, डॉ. नरेश इंगळे, डॉ. रवींद्र मोरे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कष्टकर्यांना योग्य न्याय मिळायला हवा; मात्र सध्या या घटकावरच अन्याय सुरू आहे. न्याय हवा असेल, तर सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. या सोहळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायी, भारिप-बमसंचे पदाधिकारी व उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.