पीक विमा काढण्यासाठी शेतक-यांचा अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:15 AM2017-07-31T02:15:29+5:302017-07-31T02:15:33+5:30
अकोला : पीक विमा सर्वच शेतकºयांना काढता यावा, यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या; मात्र जिल्ह्यात अकोट, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा आदी तालुक्यांमध्ये शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पीक विमा सर्वच शेतकºयांना काढता यावा, यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या; मात्र जिल्ह्यात अकोट, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा आदी तालुक्यांमध्ये शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला.
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार, आज पीक विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. पातुरात दुपारी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत दुपारपर्यंत केवळ नऊ, ४.३० वाजता युनियन बँक आॅफ इंडियाच्या पातूर शाखेतून ८०, तर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पातूर शाखेतून सायंकाळपर्यंत ४०३ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पातूर तालुक्यात ४० हजार ९६८ शेतकरी आहेत.
यापैकी दोन हजारांपेक्षा कमी शेतकºयांनी विमा काढल्याचे चित्र आहे. यावर्षी कर्जाचे पुनर्गठन, कर्जमाफी आणि नवीन कर्ज वितरण प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. यावर्षी पीक परिस्थिती पाण्याच्या अनियमिततेमुळे अतिशय धोकादायक आहे. तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी, तालुका कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी सर्व ठिकाणी भेटी दिल्या असता कुठेही शेतकºयांनी पीक विम्यासाठी गर्दी केल्याची माहिती नाही, असे सांगितले.
पीक विमा योजनेस मुदतवाढ द्या!
- पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी सोमवार, ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. पीक विमा आॅनलाइन भरण्याच्या पद्धतीमुळे बँका व सेतूसमोर मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे अद्यापही सर्वच शेतकरी पीक विमा काढू शकले नाहीत. त्यामुळे पीक विमा काढण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी शासनाकडे केली आहे.
- खारपाणपट्ट्यात शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंचनाची सुविधा नाही आणि सिंचन प्रकल्पाची कामे ठप्प पडली आहेत. कधी पाऊस न आल्याने तर कधी अतिवृष्टी झाल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होते. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेतो. अशा वेळी पीक विमा काढल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. म्हणून शेतकरी पीक विमा योजनेचे प्रस्ताव भरण्यासाठी बँकेत येत आहेत; मात्र काही ठिकाणी पीक विमा प्रस्ताव स्वीकारण्यास बँक मनाई करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
- अनेक बँकेत ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी ब्रॉडबँड सुविधा नाही, त्या बँकांनी आॅफलाइन पद्धतीने विमा प्रस्ताव स्वीकारावे तसेच पीक विमा योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.