अकोला जिल्ह्यातील कापूस केंद्रावर शेतकऱ्यांची थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:05 AM2020-05-16T10:05:52+5:302020-05-16T10:06:06+5:30
लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.
- प्रशांत विखे
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: भाववाढीच्या उद्देशाने घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता; मात्र तेल्हारा येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांची थट्टा सुरू असल्याचे चित्र आहे. कापूस खरेदीसाठी लावलेले निकष शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहेत. दर्जेदार नसल्याचे कारण समोर अनेक शेतकºयांचा कापूस परत करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.
सीसीआय केंद्रावर राज्य शासन राज्य पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत कापूस खरेदी करीत आहे. कापूस उत्पादक शेतकºयांची संख्या तीन हजाराच्यावर आहे. अगोदरच उशिरा सुरू झालेली खरेदी व त्यात लॉकडाउन सुरू असल्याने सुरुवातीला १५ व नंतर ३० शेतकºयांना केंद्र्रावर कापूस विक्रीकरिता बोलावत आहे. अनेक दिवसांपासून घरात पडलेला कापूस काही प्रमाणात डागी झाला किंवा थोड्याफार प्रमाणात मागील वेचणीचा कापूस ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये आला तर केंद्रावरून पूर्ण ट्रॉली परत पाठविण्यात येत आहे. शेतकºयांनी आपआपल्या परीने घरात किंवा गोडावूनमध्ये कापूस भरून ठेवला असताना केंद्रावर आणलेला कापूस केंद्रप्रमुख या ना त्या कारणाने परत पाठवित आहेत. असाच प्रकार शेतकºयांसोबत शुक्रवारी घडला. शेतकºयांचा आक्रोश बघता तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बाजार समितीचे सभापती, संचालक, सहायक निबंधकचे कर्मचारी खरेदी केंद्रावर पोहोचले होते. १४ मेपर्यंत केवळ ३११ शेतकºयांचा कापूस मोजला गेल्याची माहिती मिळाली असून, ३ हजाराच्यावर किंवा जवळपास असलेल्या शेतकºयांचा कापूस केव्हा मोजल्या जाईल व त्याचे पैसे केव्हा मिळतील,असा प्रश्न आहे. प्रतीक्षा करूनही जर कापूस खरेदी केला नाही तर काय करायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. कापसाची अवस्था बघता शासनाची ही खरेदी जगू देत नाही अन् मरू पण देत नाही, अशा अवस्थेत शेतकरी आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी कापसाचा पेरा करणार नसल्याचे चित्र आहे.
शेतकºयांचे नियोजन बिघडले
कापूस विकून शेतकरी खरिपाचे नियोजन करतात. यावर्षी सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. तसेच व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने शेतकºयांचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगाम काही आठवड्यावर आला असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
मी कापूस खरेदी ही शासनाच्या निकषानुसार करीत आहे. निकषात बसत नसलेला कापूस नाइलाजास्तव परत पाठविल्या जात आहे.
-जगन्नाथ बोंडे,
ग्रेडर, तेल्हारा.