शेतकरी आंदोलनाचे स्वरूप मर्यादित!

By admin | Published: June 8, 2017 01:37 AM2017-06-08T01:37:11+5:302017-06-08T01:37:11+5:30

संप शेतकरी करीत नसून, गुंड करीत आहेत- भाजप प्रवक्त्याचा आरोप

Farmer's movement is limited! | शेतकरी आंदोलनाचे स्वरूप मर्यादित!

शेतकरी आंदोलनाचे स्वरूप मर्यादित!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफीसाठी सुरू असलेला संप शेतकऱ्यांचा नाही. तो काही गुंड आणि राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे आणि हे आंदोलन केवळ दोन ते तीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित असून, त्याला प्रसारमाध्यमांकडून व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप सरकार हे शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी येथे केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण केली. मोदी सरकारने तीन वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी भाजपतर्फे पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले, भाजपचे शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, गिरीश जोशी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्यात आणि आता तेच शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत. राज्यामध्ये केवळ दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संप सुरू असून, या संपामध्ये शेतकरी सहभागी नाहीत; परंतु त्याला काही लोक व्यापक स्वरूप देण्याचा केवळ देखावा करीत आहेत, असा दावा त्यांनी केला. अन्नदाता आपला शेतमाल रस्त्यावर फेकून कसा आंदोलन करेल, हा संप शेतकऱ्यांच्या नसून, गुंडांचा असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला. भाजप सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत ११ हजार कोटी ९५ कोटी रुपयांची मदत दिली. पीक विम्याचा सात हजार कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला. कर्जमाफी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या संपणाऱ्या नाहीत. त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करीत असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.

आ. सावरकर मदतीला धावले
भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर पत्रकारांनी शेतकरी संपाच्या मुद्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तेव्हा आमदार रणधीर सावरकर प्रदेश प्रवक्त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. नाफेडची तूर खरेदी, शेततळे, राजीव गांधी जीवनदायी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी आम्ही शासनदरबारी सातत्याने प्रश्न मांडत असतो, असे सांगत आ. सावरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Farmer's movement is limited!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.