सरकार बनविण्याच्या लगबगीत शेतकऱ्यांच्या मदतीचा पेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:25 PM2019-11-09T12:25:05+5:302019-11-09T12:25:16+5:30
पीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- संतोष येलकर
अकोला: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, नवे सरकार अद्याप सत्तारूढ झाले नाही. सरकार बनविण्यासाठी सुरू असलेल्या लगबगीत राज्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्याचा पेच कायमच आहे. त्यामुळे पीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा संपल्यानंतर महिनाभराचा कालवधी उलटून गेला; मात्र अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने, विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक नुकसानाच्या पंचनामे करण्याचे काम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत मात्र अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. पंधरा दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी; नवे सरकार स्थापन करण्याचा गुंता सुटला नाही. सरकार स्थापनेसाठी मुंबईत राजकारण्यांची लगबग सुरूच असल्याने, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पीक नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यानुषंगाने नवे सरकार केव्हा सत्तारूढ होणार आणि शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिकांचे उत्पादन बुडाले; पण मदत किती मिळणार?
महिनाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सर्वच पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा पेच शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. ‘अवकाळी’च्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले असले तरी, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी किती मदत मिळणार, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित होत आहे.