नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील अर्धनग्न शेतकऱ्यांचा एल्गार!
By संतोष येलकर | Published: October 13, 2022 07:15 PM2022-10-13T19:15:42+5:302022-10-13T19:15:58+5:30
नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले.
अकोला : परतीच्या पावसात गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाच्या तडाख्यात सोयाबीनच्या शेंगा सडल्याने, पीक नुकसानीचा तातडीने सर्वे करुन, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम व जामठी सर्कलमधील अर्धनग्न शेतकऱ्यांनी एल्गार पुकारित गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. संबंधित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात कुरुम व जामठी बु.सर्कलमधील राजनापूर खिनखिनी, कवठा सोपीनाथ, मारोडा, सैदापूर, चिंचखेड व जामठी बु. या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सतत जोरदार पाऊस बसरत आहे.
त्यामुळे शेतातील सोयाबीनच्या शेंगा सडल्या असून, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने सोयाबीन पिकाची सोंगणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून, मळणी यंत्रदेखिल शेतकरी शेतात नेऊ शकत नाही. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन तयार कसे करणार, या बाबतची चिंताही शेतकऱ्यांना सतावत आहे. परतीच्या पावसात शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांच्या शिवारातील सोयाबीन पीक नुकसानीचे तातडीने सर्वे करण्यात यावे, पीक नुकसानीची सरसकट भरपाइ देण्यात यावी व पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करीत, संबंधित गावांमधील अर्धनग्न शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी संजय सावळे, सचिन सावळे, बाबुराव बाजड, रुपेश कडू, अमोल वडतकर, राजू गवइ, मंगेश कुकडे, गोकुळ बाजड आदी शेतकरी उपस्थित होते.
अर्धनग्न शेतकऱ्यांनी वेधले लक्ष
मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी, कवठा सोपीनाथ, मारोडा, सैदापूर, चिंचखेड, जामठी बु. येथील शेतकऱ्यांनी अंगातील शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेत सोयाबीन पीक नुकयसानीचे सर्वे करण्यात यावे, सरसकट नुकसान भरपाइ द्यावी व पीक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत मागणी केली व मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षकांना सादर केले. अर्धनग्न शेतकऱ्यांच्या या एल्गाराने नागरिकांचे लक्ष वेधले होते.