शेतकरी संघटनेने केले खासदारांच्या घरासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:07 PM2020-09-23T18:07:41+5:302020-09-23T18:08:10+5:30
शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले.
अकोला : केंद्र शासनाने टाकलेली कांद्यावरील निर्यात बंदी कायम स्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवा, अन्यथा या बंदीमुळे शेतकºयांच्या संसाराची राखरांगोळी होईल, असा इशारा देण्यासाठी शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले.
केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतून वगळला आहे. नवीन कायद्यानुसार, शेतकºयांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे; मात्र गेल्या सहा महिन्यांनंतर आता कांद्याला चांगले भाव आले असतानाच केंद्र शासनाने अचानक निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकन्यांचा विश्वासघात केला आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांच्या प्रपंच्याची राखरांगोळी करणारा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला. शेतकºयांच्या व्यथा केंद्रीय व्यापार मंत्री पीयुष गोयल यांच्यापर्यंत पोहोचविण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.
अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर आंदोलन करताना संघटनेच्या पदाधिकाºयांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. खासदार धोत्रे यांच्या चिरंजिवांनी पदाधिकाºयांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललीत बहाळे, सतीश देशमुख, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, डॉ.नीलेश पाटील, सुरेश जोगळे, लक्ष्मीकांत कौठकर, शंकर कंवर, शरद सरोदे उपस्थित होते.