शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी आधारासाठी ‘दिलासा’

By admin | Published: September 21, 2015 01:41 AM2015-09-21T01:41:40+5:302015-09-21T01:41:40+5:30

अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी १६९१ कुटुंबांचे होणार सर्वेक्षण.

Farmers 'relief' for permanent support of suicidal families | शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी आधारासाठी ‘दिलासा’

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी आधारासाठी ‘दिलासा’

Next

संतोष येलकर / अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून, त्याद्वारे कायमस्वरूपी आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ६९१ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवारी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. कधी जादा तर कधी कमी पाऊस, अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नापिकीमुळे निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडल्याच्या स्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येनंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रचंड वाताहत होते, उदरनिर्वाहासह आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाखाची सरकारी मदत दिली जाते; मात्र कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ही मदत पुरेशी ठरत नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या उपाययोजना राबवून, त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी मदतीचा आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून दिलासा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सन २00१ ते सप्टेंबर २0१५ या १५ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या १ हजार ६९१ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना खासगी नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय आणि व्यवसायाचे प्रशिक्षण इत्यादी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांद्वारे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी दिलासा अभियानात शासकीय-निमशासकीय आणि खासगी पद्धतीने मदत करण्यात येणार आहे.

Web Title: Farmers 'relief' for permanent support of suicidal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.