चोहोट्टाबाजारमध्ये शेतकऱ्यांनी काढला मोर्चा
By admin | Published: June 7, 2017 07:19 PM2017-06-07T19:19:42+5:302017-06-07T19:19:42+5:30
दुध, कांदे,भाज्या फेकल्या रस्त्यावर : मोर्चास उत्स्फुर्त प्रतिसाद
चोहोट्टा बाजार : संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा देत संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामीण भागातला शेतकरीही आता रस्त्यावर उतरला आहे. ७ जून रोजी चोहोट्टा बाजार येथे संपावरील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करीत मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज मिळावे, पशूधन विमा लागू करण्यात यावा, आदी विषयावर शेतकऱ्यांच्या वतीने रमेश वानखडे, आनंदा पाचबोले, सुनील अघडते, कालेखाँ पठाण, गोपाल सपकाळ, कपिल ढोके, राजू खोटरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत शेतकऱ्यांनी दूध, कांदा व इतर भाज्या रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, दहीहांड्याचे ठाणेदार गणेश वनारे यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी गोपाल सपकाळ, रमेश वानखडे, आनंदा पाचबोले, विशाल काकड, दिलीप वडाळ, सुनील अघडते, कपिल ढोके, नीलेश मानकर, मनीष मोडक, राजू खोटरे, अतुल खोटरे, शंकरराव तुरूक, विलास साबळे, गोकुळ तुरूक, संजय बागलकर, सुनील वहिले, नरेंद्र म्हैसने, हर्षल ठाकरे, स्वप्निल अरबट, राजू शेळके, गंगाधर बुंदे, बाळू इंगळे, मुकींदा वसू, गजानन पाचबोले, उमेश शेगोकार यांचेसह चोहोट्टा, दनोरी, पळसोद, करतवाडी, करोडी, पिलकवाडी, नखेगाव, टाकळी खुर्द, टाकळी बु., कावसा, कुटासा, देवर्डा, निजामपूरसह इतर गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.