शेतकऱ्यांनी परत केले तुटपुंज्या विम्याचे चेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:24+5:302021-03-23T04:19:24+5:30
अकाेला : अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून, त्यांना फळ पीकविम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर ...
अकाेला : अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून, त्यांना फळ पीकविम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर झाली आहे. ज्या विम्याचा प्रीमिअम आठ हजार आहे, त्या विम्यापाेटी केवळ हेक्टरी २६५ तर काहींना ५०० रुपये मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. विम्याचा दावा देताना विमा प्रतिनिधीने भेदभाव केला तसेच शेतकऱ्यांशी त्यांची उद्धट वागणूक असल्याची तक्रार घेऊन साेमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी तुटपुंज्या विम्याचे चेक जिल्हाधिकाऱ्यांना परत केले असून, विमा कंपनीच्या विराेधात राेष व्यक्त केला.
अकाेट तालुक्यातील पणज, आकाेलखेड महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक अशाेक वाटिकेपासून केळीचे खांब हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माेर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयात माेर्चा आल्यानंतर पाेलिसांनी माेर्चा अडविल्यामुळे शेतकऱ्यांनी तिथेच ठिय्या मारला. रविकांत तुपकर, सतीश देशमुख आदींसह काही निवडक शेतकऱ्यांसाेबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियाेजन भवनात संवाद साधून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ४५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना तुटपुंजी रक्कम मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. फळ पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील ६००पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. मात्र विमा कंपनीने फसवणूक केली. एकीकडे राज्य सरकार या नुकसानभरपाईपाेटी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत देत असताना विमा कंपनीने शेतकऱ्यांची तुटपुंज्या रकमेवर बाेळवण केली असा आराेप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
बाॅक्स....
विमा प्रतिनिधी निलंबित
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाेबत उद्धट वागणूक करणारा व शेतकऱ्यांना एफआयआरची धमकी देणारा विमा प्रतिनिधी अखेर निलंबित करण्यात आला. सपकाळ असे या प्रतिनिधीचे नाव असून, विम्याचा दावा देताना यांनी प्रचंड भेदभाव केल्याचे शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी उघड केले. या प्रतिनिधींवर कारवाई हाेणार नाही ताेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय साेडणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती. त्याची दखल जिल्हाधिकारी यांना घ्यावीच लागली.
बाॅक्स..
जिल्हाधिकारी कार्यालयातच साेडल्या शिदाेऱ्या
अकाेट तालुक्यातून सकाळीच मिळेल त्या वाहनाने शेतकरी अकाेल्यात दाखल झाले हाेते. पाणी व शिदाेरी असे साहित्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयातच शिदाेऱ्या साेडल्या. जाेपर्यंत न्याय मिळत नाही ताेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय न साेडण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती.
काेट..
शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षात आला आहे. या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचित केले असून, येत्या आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागेल, असा प्रयत्न केला जाईल. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकाेला
काेट...
मस्तवाल विमा प्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या दबावापाेटी पदावरून हटविले आहे. मात्र एवढ्यावर हे आंदाेलन संपले नाही. जाेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळत नाही ताेपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल. प्रसंगी पुन्हा आंदाेलन करू.
रविकांत तुपकर, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना