बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:28+5:302021-05-21T04:19:28+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यात डीएपी व युरिया खताचा तुटवडा कायम असून, काही कृषिसेवा केंद्रांनी पूर्वीच युरिया व डीएपी खताचा ‘स्टॉक’ ...
मूर्तिजापूर : तालुक्यात डीएपी व युरिया खताचा तुटवडा कायम असून, काही कृषिसेवा केंद्रांनी पूर्वीच युरिया व डीएपी खताचा ‘स्टॉक’ ठेवल्यामुळे निवडक दुकानांवर उपलब्ध असल्याने बियाणे व खतखरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच झुंबड उडाल्याचे गुरुवारी दिसून आले. पहाटे ५ वाजेपासून शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. डीएपी, युरिया त्याचप्रमाणे महाबीजच्या बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागले.
खरीप पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच तालुक्यात रासायनिक डीएपी, युरिया खतांचा व महाबीजच्या सोयाबीन बियांचा तुटवडा असल्याने शेतकरी वणवण भटकत आहेत. तालुक्यात व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा करण्यात येत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. अनेक दिवसांपासून खतांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची आंतरमशागत खोळंबली आहे. तालुक्यात लॉकडाऊन असून, संपूर्ण पंधरवड्यात शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळणे कठीण झाले आहे. अशातच तालुक्यात खताचा तुटवडा असल्याने विशेष म्हणजे युरिया व डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीत उघडी राहत असल्याने शेतकरी दुकानासमोर पहाटेपासूनच रांगा लावून ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत शहरात केवळ एकाच दुकानात डीएपी उपलब्ध असल्याने खत व बियाणांचा प्रचंड तुटवडा असल्याने गुरुवारी खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दुकानात एकच गर्दी केली.
५० टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे मिळणार असून, त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर २० मेपर्यंत नोंदणी करण्यात आली. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत या पोर्टलवरून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी महाबीजचे बियाणे राखीव ठेवण्यात आले आहे.
फोटो :
तालुक्यात खताची समस्या नाही. महाबीज बियाणाचा तुटवडा आहे. तालुक्यात १२ टक्के बियाणांची अलाॅटमेन्ट केली आहे. पाच हजाराच्या वर बियाणे बॅग उपलब्ध झाल्याने प्रत्येकी दोन बॅग वितरित करण्यात येत आहेत. खतांची कृत्रिम टंचाई दुकानदार करीत असतील तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करू.
- गोपाल बोंडे
कृषी अधिकारी, पंचायत समिती, मूर्तिजापूर
बियाणे व खतखरेदी करण्यासाठी पहाटे ५ वाजेपासून रांगेत उभे राहावे लागले. दुकानदाराने केवळ शंभर शेतकऱ्यांना माल देऊन टार्गेट संपले असल्याचे सांगितले. यामुळे माझ्यासह शेकडो शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदी न करता खाली हात परतावे लागले.
-रवींद्र भुजिंगराव गणेशपुरे, शेतकरी, कंझरा
महाबीज बियाणे केवळ नोंदणी केलेले उपलब्ध आहे. खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी महाबीजचे बियाणे उपलब्ध नाही. सर्व प्रकारच्या खताचा साठा गतवर्षीचा उपलब्ध असल्याने जुन्याच किमतीमध्ये विक्री सुरू आहे, नवीन खत उपलब्ध झाल्यास निर्धारित किमतीमध्ये ते विक्री करावे लागणार
- अतुल इंगळे
संचालक, कृषिसेवा केंद्र
अशा आहेत खताच्या किमती
डीएपी - १२०० रुपये
१०/२६/२६ - ११७५ रुपये, ११८५ रुपये
२०/२०/०.१३ - ९७५ रुपये १००० रुपये
२०/२०/० - ९५० रुपये १५/१५/१५- १०६० रुपये
युरिया - २६५ रुपये
सुपरफॉस्फेट - ४०० रुपये ,४२० रुपये
एमओपी - ८७० रुपये