महाबीजच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:18 AM2021-05-22T04:18:15+5:302021-05-22T04:18:15+5:30
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची महाबीजच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, येथील कृषी सेवा केंद्रांमध्ये दि. २१ मे रोजी सकाळी ...
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची महाबीजच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, येथील कृषी सेवा केंद्रांमध्ये दि. २१ मे रोजी सकाळी १२ वाजताच्या दरम्यान महाबिजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. कृषी सेवा केंद्र चालकांनी महाबिजचे सोयाबीन बियाणे देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने महाबिज महामंडळाचे बियाणेसुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांना सोयाबिन बियाणे उपलब्ध करण्यासाठी महाबिज असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांची महाबीजचे बियाणे खरेदीसाठी धावपळ होत असून, सोयाबिन बियाण्यांची मागणी लक्षात घेता बियाणे महामंडळाकडे पुरेसा सोयाबीन बियाणे साठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-----------------------
कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
कृषी सेवा केंद्रचालकांनी महाबिजचे बियाणे देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार प्राप्त होताच तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी तत्काळ कृषी सेवा केंद्रात धाव घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. कृषी सेवा केंद्राकडे महाबिज सोयाबिन बियाणे किती प्रमाणात साठा उपलब्ध आहे, याची चौकशी केली. महाबिजचे-१५८ या वानाची विक्री न करता जेएस ३३५ या वानाची शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यानुसार विक्री करण्याचे आदेश यावेळी दिले.
-------------------
कृषी सेवा केंद्रात महामंडळाचे सोयाबिन बियाणे उपलब्ध करावे व वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कृषी सेवा चालकांकडून बियाण्यांचा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करून बियाण्यांचा काळा बाजार थांबवावा.
-मंगेश तायडे, सरपंच, वाडेगाव.