सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकरी खासगी कंपन्यांच्या दावणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:18+5:302021-05-27T04:20:18+5:30

अकोला : यंदा सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. महाबीजचे बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा ...

Farmers rush to private companies for soybean seeds! | सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकरी खासगी कंपन्यांच्या दावणीला!

सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकरी खासगी कंपन्यांच्या दावणीला!

Next

अकोला : यंदा सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. महाबीजचे बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा लागत असून, कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. यावर्षी महाबीजकडून जिल्ह्यात केवळ ११ हजार ३७१ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. मागील वर्षी २६ हजार क्विंटल बियाणे दिले होते. अनुदानित बियाणे कमी असल्याने शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांच्या महागड्या बियाण्यांची खरेदी करावी लागणार आहे. खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीची कामे, बियाणे व खते खरेदी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या कामात व्यत्यय येत आहे. हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव गरजेची आहे. याकरिता पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजविले जात आहेत. आतापर्यंत केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले आहे. आर्थिक अडचणी असल्याने अनुदानित व कमी किमतीचे बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने यंदा सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. महाबीजचे बियाणे २ हजार २५० रुपये दराने मिळत आहे. तेच खासगी कंपनीचे बियाणे ३२०० ते ३३०० रुपये बॅग मिळत आहे. त्यामुळे महाबीजचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परंतु यंदा जिल्ह्यात महाबीजकडून कमी प्रमाणात बियाणे वितरीत झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातील काही बियाणे महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहे.

वितरकांना आठ हजार क्विंटल बियाणे!

जिल्ह्यात महाबीजकडून ११ हजार ३७१ क्विंटल सोयाबीन बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. परंतु यातील ८ हजार ६३ क्विंटल बियाणेच वितरकांना शेतकऱ्यांना विकण्यासाठी देण्यात येणार आहे. ९० टक्के बियाणे वितरीत झाले असल्याचे महाबीजकडून सांगण्यात आले. उर्वरित ९४१ क्विंटल बियाणे हे प्रात्यक्षिकाकरिता देण्यात येणार असून, २ हजार ३६७ क्विंटल बियाणे महाडीबीटीमार्फत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या रांगा कायम

मागील चार दिवसांपासून महाबीजचे सोयाबीन बियाणे घेण्यासाठी शहरातील महाबीज वितरकांकडे शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांना बियाणे नसल्याने रिकामी हाताने परतावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे.

घरचे बियाणे नेमके किती?

मागील वर्षीपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना सोयाबीनचे घरचे बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन करीत आहे. डिसेंबर महिन्यात समोर आलेल्या माहितीत शेतकऱ्यांनी १ लाख २७ हजार क्विंटल बियाणे राखून ठेवले होते. मात्र, याला चार महिने लोटले. सोयाबीनची दरवाढ झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ते विकले. त्यामुळे या शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे नेमके किती? असा प्रश्न निर्माण होत आहे.

नियोजित पुरवठा नाही!

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनात महाबीजकडून २५ हजार क्विंटल बियाणे मिळणार असल्याचे सांगितले होते. परंतु यंदा बियाणे मोठ्या प्रमाणात चाचणीत फेल ठरल्याने नियोजित पुरवठा होऊ शकला नाही.

महाबीजकडून होणारा बियाण्यांचा पुरवठा

सोयाबीन

११,३७१ क्विंटल

तूर

१,४६८ क्विंटल

मूग

८ क्विंटल

उडीद

४६२ क्विंटल

ज्वारी

३७ क्विंटल

अनुदानित सोयाबीन बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज केला आहे. महाबीजच्या बियाण्यांसाठी मोठ्या रांगा लागत आहेत. बियाणे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदा वेळ पडल्यास वाढीव दराने मिळत असलेल्या खासगी कंपनीचे बियाणे विकत घेण्याची वेळ येणार आहे.

- प्रकाश बरडे, शेतकरी, वणी रंभापूर

महाबीजच्या बियाण्यांसाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. तरी बियाणे हाती लागत नाही. घरचेही बियाणे शिल्लक नाही. त्यामुळे खासगी कंपनीचे महागडे बियाणे विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे लागवड खर्चही वाढणार आहे.

- जगन्नाथ इंगळे, शेतकरी, पाचपिंपळ

मागील वर्षी सोयाबीन मोठ्या प्रमाणात खराब झाले. त्यामुळे त्यांची उगवण शक्ती कमी होती. परिणामी, घरचे बियाणेही शिल्लक ठेवता आले नाही. आता खासगी कंपनीचे बियाणे जास्त किमतीत मिळत आहे. हंगामासाठी हे बियाणे घेतल्याशिवाय पर्याय नाही.

- महेंद्र बोर्डे, शेतकरी, शिंगोली

Web Title: Farmers rush to private companies for soybean seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.