खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:58+5:302021-06-23T04:13:58+5:30
देवानंद आग्रे रोहनखेड : खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहणखेड परिसरात सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून ...
देवानंद आग्रे
रोहनखेड : खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहणखेड परिसरात सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून बी-बियाणांची खरेदी केली. गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील पेरण्या खोळंबल्या आहे. रोहणखेड शेतशिवारात केवळ ५ टक्केच पेरणी झाली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
यंदा चांगला पाऊस बरसणार अशी शक्यता हवामानखात्याने वर्तविली होती. दरम्यान, सुरुवातीला रोहणखेड परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. पेरणीपासून पाऊस न झाल्याने पेरणी उलटण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सद्यस्थिती परिसरातील खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे जात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सतत नापिकीचा सामना करीत असलेल्या बळीराजा आणखी चिंताग्रस्त झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. (फोटो)
-----------------------------
दररोज ढग येतात दाटून...
परिसरात दररोज आकाशात ढग दाटून येतात; पाऊस पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सकाळी कडक ऊन व त्यानंतर ढगाळ वातावरण पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांनीही बी-बियाण्यांची खरेदी थांबविल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरातील कृषी सेवा केंद्रांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.
---------------
चाराटंचाईचे सावट
पावसाने दडी मारल्याने परिसरातील पेरण्या लांबल्या आहेत. तसेच परिसरात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच नदी-नाले शेततळे कोरडे पडल्याने गुरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
---------------------
रोजगारही ठप्प !
दमदार पाऊस झाला असता, तर शेतशिवारात पेरणीला सुरुवात झाली असती. मात्र पावसाअभावी पेरणीचे कामे थांबल्याने शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. सद्य:स्थितीत मशागतीचे कामे आटोपली असून, मजुरांच्या हाताला काम नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.