शेतक-यांनी ४१ लाख क्विंटल कापूस विकला व्यापा-यांना!
By admin | Published: December 7, 2015 02:49 AM2015-12-07T02:49:07+5:302015-12-07T02:49:07+5:30
सीसीआय आणि पणणकडून चुका-यास विलंबाचा परिणाम.
अकोला : कापूस उत्पादक शेतकर्यांनी यावर्षी खासगी बाजारात आतापर्यंत ४१ लाख २९ हजार क्विंटलपेक्षघ जास्त कापूस विकला असून, पणन महासंघाकडे १ लाख ७२ हजार ३८८, तर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. आधारभूत किमतीपेक्षा १00 रुपये जास्त मिळत असल्याने शेतकर्यांनी व्यापार्यांना कापूस विकला आहे. यावर्षी कापसाचे चुकारे बँके त थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा होत असल्याने चुकार्यांना विलंब होऊन शेतकरी खासगी व्यापार्यांकडे वळला असल्याचे दिसून येते. सीसीआयने यावर्षी कापूस उत्पादक भागात ४८ कापूस खरेदी केंद्र सुरू केली असून, २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला. पणन महासंघाने ७९ खरेदी केंद्रे सुरू केली. कापसाचे हमी दर प्रतिक्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असल्याने शेतकर्यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावले जात असल्याचे बघून व्यापार्यांकडून थेट गावात जाऊन कापूस खरेदी केला जात आहे. यावर्षीचा दुष्काळ आणि खरीप पिकांचे झालेले नुकसान बघता कापसाचा उत्पादन खर्च निघावा, यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कापसाला बोनस किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून दरवाढीची घोषणा होईल, यासाठी अनेक शेतकर्यांनी कापूस अद्याप विकलेला नाही. यासंदर्भात महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी आतापर्यंत १ लाख ७२ हजार क्विंटल कापूस खरेदी केला असून, ५ डिसेंबरपर्यंतचे चुकारे बँकेत जमा केले असल्याचे सांगीतले. चुकारे मिळण्यास शेतकर्यांना सुरुवातीला अडचण वाटत असेल, पण ही योजना चांगली असल्याचे पुस्ती त्यांनी जोडली.