शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज; सरकारशी चर्चा करणार: राज्यपाल रमेश बैस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 06:03 AM2023-06-11T06:03:46+5:302023-06-11T06:03:54+5:30
‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात दिली ग्वाही, बोगस बियाणे, खत विक्रेत्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार; कृषिमंत्री सत्तार यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का हाेतात, याची कारणे शोधून शेतकऱ्यांना सक्षम कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासाेबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कठाेर कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शनिवार, १० जून रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल ग्रँड जलसा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, अध्यक्षस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा व समूह संपादक विजय बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित हाेते.
‘लाेकमत’ लाेकशाहीचा आवाज
‘लाेकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा हे जननायक हाेते, त्यांनी लाेकमत हे सामान्य लाेकांचे वर्तमानपत्र बनविले, लाेकमतचा इतिहास राेमांचकारी आहे, आज लाेकमत राज्यासह गाेवा, दिल्लीत पाेहाेचला असून लाेकशाहीचा आवाज बनला आहे, लाेकमत हे असेच क्रमांक एकचे दैनिक झाले नाही, ते हाेण्यामागे जवाहरलालजी दर्डा यांनी दिलेल्या विचारांचा, त्याग, तपस्यांचा वारसा आहे, वाचकांच्या आशाआकांक्षाची जाण ठेवत वाचकांसाठी भांडण्याची सक्षमता ‘लाेकमत’मध्ये आहे.
काेणताही विषय लावून धरण्यासाठी लाेकमतने संकाेच केला नाही, त्यामुळेच लाेकमत वाचकांचा विश्वासपात्र बनला, अशा शब्दांत राज्यपाल यांनी लाेकमतचा गाैरव केला. ते म्हणाले, मी महाराष्ट्रात आल्यावर लाेकमतचा वाचक झालाे, आता दिल्लीतही लाेकमत वाचायला मिळताे याचे समाधान आहे. लाेकमतचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांनी डिजिटल आवृत्तीमधून लाेकमतला ग्लाेबल वर्तमानपत्र बनविले असून इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत लाेकमतमध्ये ग्रामीण व शहरी बातम्यांचा समन्वय साधला जाताे असे निरीक्षण नाेंदविले. लाेकमतने काेण्या एका पक्षाची पाठराखण केल्याचे दिसले नाही, मी कधीही लाेकमतला काेणाचेही चरित्र्यहनन करताना बघितले नाही, असे गाैरवाेद्गार त्यांनी काढले.