शेतकऱ्यांची तक्रार येता कामा नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:20 AM2017-07-19T01:20:33+5:302017-07-19T01:44:19+5:30
पालकमंत्र्यांचा निर्देश : अकोट येथे कृषी समाधान शिबिर; शेतकऱ्यांच्या ४० तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कदापिही हयगय केली जाणार नाही. प्रशासनाने नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. शेतकऱ्यांची कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सक्त सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या.
अकोट येथील रावसाहेब शिवपूरकर सभागृहात आयोजित कृषी समाधान शिबिरात कृषीसंबंधी ४० शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून त्वरित निराकरण करण्याचे आदेश डॉ. रणजित पाटील यांनी दिले. तक्रारींमध्ये कृषी विभाग, बियाणे कंपनी, कृषी पीक विमा योजना, शेततळे, सिंचन विहीर, कृषी अवजारे, विद्युत जोडणी, सौरऊर्जा, विशेषत: अकोट-तेल्हारा तालुक्यामध्ये अत्यंत कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीसंदर्भात सर्व्हे करणाऱ्या तक्रारींचा समावेश होता. यावेळी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी गटशेतीकडे वळावे, ही योजना आणली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेंद्र निकम, आत्मा प्रकल्प संचालक बाविस्कर, कृषी विकास अधिकारी अकोला ममदे, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर, तहसीलदार विश्वनाथ घुगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, पं.स.चे कृषी अधिकारी अनिल राठोड, गटविकास अधिकारी कालीदास तापी, महावितरणचे कार्यकारी अभियंता काकडे, डॉ. पंदेकृविचे शास्त्रज्ञ साखरे, माजी आमदार वसंतराव खोटरे, नारायणराव गव्हाणकर व डॉ. जगन्नाथ ढोणे, पं.स. उपसभापती सूर्यकांता घनबहादूर, माजी सभापती अंजनी तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाधान शिबिराकरिता अकोट व तेल्हारा तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांसह भाजप-सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते.
‘शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा’
बाळापूर: शासनाच्या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. बाळापूर तालुक्यात आयोजित कृषी समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या शिबिरात २३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, सरकार कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना रबावत आहे. शेतकरी स्वावलंबी व्हावा, कर्जमाफीबरोबरच त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळच येऊ नये यासाठी शासन विविध उपाययोजना आखत आहे. शेतीत जाणारे पांदन रस्ते खडीकरण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राममूर्ती, अग्रणी बँकेचे प्रबंधक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.एस. निकम, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे, पं.स. सभापती मंगला तितूर, आत्मा समितीचे अध्यक्ष गणेश तायडे, पातूरचे श्रीकांत बराटे, उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर यांनी तर संचालन बाळासाहेब वानखडे यांनी केले. यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जगन्नाथ ढोणे, वसंतराव खोटरे, शिवसंग्रामचे संदीप पाटील, पं.स.चे गटविकास अधिकारी वाय.डी. शिंदे, एन.एम. माने, आशीष शेलार, महावितरणचे उपअभियंता काळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मिलिंद जाधव आदी उपस्थित होते. आभार तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर यांनी मानले.
जनतेची कामे करा, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकारी
जनतेची कामे प्राधान्याने करा, सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या, जेणेकरून तक्रारी कमी होतील. अन्यथा जे अधिकारी, कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी दिला.
एप्रिल २०१८ पर्यंत कृषी पंपांना वीज
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित शिबिरात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी एप्रिल २०१८ पर्यंत कृषी पंप जोडण्याची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच दोन वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येईल. कृषी उपयोगासाठी सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प स्थापन करण्यात येतील. बाळापूर तालुक्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून खडीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.