कोवळ्या पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्रभर जागल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 10:51 AM2021-06-26T10:51:22+5:302021-06-26T10:51:34+5:30
Farmers stay up all night to protect their crops : कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे.
- रवी दामोदर
अकोला: शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना विषाणू, तर दुसरीकडे अस्मानी संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी दुहेरी संकटात असतानाच शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने चांगली सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. सध्या शेतकऱ्यांनी पेरलेली पिके शेतात डोलू लागली आहेत. या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे. पिके पावसाअभावी व वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागत असल्याचे चित्र आहे.
गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने डोलणाऱ्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच जिल्ह्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता कोवळ्या पिकांकडे वळविला असून, शेतकरी आता तिहेरी संकटात सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पुढील आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. (फोटो)
पाऊसही रुसला!
येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ आली, तर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सध्या जी पिके शेतात उगवली आहेत त्या पिकांना पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, ते शेतकरी स्प्रिंक्लरद्वारे पाणी देत आहेत. जर पाऊस लांबला, तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही.
रात्रीस खेळ चाले!
दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाही. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळपचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा जी धोक्यात टाकून रात्रीच्या सुमारास जागल करून पिकांचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.
---------------------
दररोज ढग येतात दाटून!
मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी करून उगवलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाऊस मात्र गायब झाला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात. सकाळी पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, तर सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.
जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत असल्याने रात्रभर जागल करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.
- ऋषिकेश घोगरे, शेतकरी.